
सामना प्रतिनिधी । नाशिक
केंद्र शासनाच्या उडान योजनेच्या दुसऱया टप्प्यातील हैदराबाद-नाशिक-अहमदाबाद या विमानसेवेला एक फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
नाशिक शहर राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वच मोठय़ा शहरांना जोडले जावे, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे प्रयत्न करीत आहेत. मागील वर्षी उडान योजनेंतर्गत नाशिक शहर देशातील प्रमुख नऊ शहरांना जोडण्याची घोषणा झाली. काही महिन्यांपूर्वी नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू झाली. नाशिक-अहमदाबाद विमानसेवा 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी एक फेब्रुवारीला हैदराबाद-नाशिक-अहमदाबाद विमानसेवेला प्रारंभ होईल. ही विमानसेवा दररोज राहील. यासाठी 70 आसनक्षमतेचे विमान आहे. हैदराबाद-नाशिक हे अंतर 648 किलोमीटर, तर नाशिक-अहमदाबाद 357 किलोमीटर आहे. नाशिकहून हैदराबादला आता पावणेदोन तासात, तर अहमदाबादला अवघ्या सवातासात जाता येणार आहे.
हैदराबाद येथून सकाळी 6.45 वाजता विमानाचे उड्डाण होईल, ते 8.30 वाजता नाशिकला पोहचेल. यातील 70 पैकी 35 आसने अनुदानित राहतील, हे प्रवासभाडे 2930 रुपये आहे. तर नाशिक-अहमदाबादसाठी 2060 रुपये लागतील. हैदराबादहून नाशिकला आलेले विमान सकाळी 8.55 वाजता अहमदाबादच्या दिशेने उड्डाण करेल. तेथे ते 10.10 वाजता पोहचेल. तेथून 10.40ला पुन्हा नाशिककडे झेपावणार आहे. ते नाशिकमध्ये 11.55ला पोहचेल. दुपारी 12.20 वाजता नाशिकहून निघणारे विमान हैदराबादला 2.25 वाजता पोहचेल. या विमानसेवेमुळे नाशिक जिह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.





























































