
सामना ऑनलाईन । भिवंडी
आईस्क्रीममध्ये मिसळण्यात येणाऱया पावडरच्या फॅक्टरीत भीषण आग लागल्याची घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की, काही क्षणांत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. सुदैवाने कामगारांनी कंपनीबाहेर पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. अग्निशमन जवानांनी तीन तासांच्या केलेल्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
भिवंडी-ठाणे महामार्गावरील काल्हेर गावानजीक जय मातादी कंपाऊंडमध्ये रोनक इंटरप्रायजेस लिमिटेड नावाची आईस्क्रीम फॅक्टरी आहे. या कारखान्यात आईस्क्रीममध्ये मिक्स करण्यात येणारी पावडर बनवण्यात येते. काल रात्री दीडच्या सुमारास पॅकेजिंगचे काम सुरू असतानाच कारखान्याला अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की, पुढच्या दहा मिनिटांतच संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी गेला.

































































