
सामना प्रतिनिधी, नाशिक
परराज्यातून अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने आणण्यात आलेला साडेतीन लाखांचा मद्यसाठा शुक्रवारी जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या भरारी पथकाने ही कामगिरी पार पाडली. याप्रकरणी दोघा परप्रांतीयांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नाताळ व 31 डिसेंबरच्या अनुषंगाने परराज्यातून शहरात मद्याची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधिक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पथकाने त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावर अंबोली शिवारात सापळा रचला. वाहन तपासणीत नंबरप्लेट नसलेल्या पांढऱया बोलेरो कारमधून दादरा नगर हवेली येथून आणलेला सुमारे 3 लाख 64 हजारांचा मद्यसाठा जप्त केला.
गुजरातच्या अंभेरी येथील संजय गांधी (23) व राजस्थानच्या प्रतापपुरा येथील नोरतमल साहू (24) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. बोलेरो कारसहीत एकूण 9 लाख 64 हजारांचा ऐवज पथकाने जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक एम. बी. चव्हाण, उपनिरीक्षक एस. एस. रावते, देवदत्त पोटे, कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, अमन तडवी, विठ्ठल हाके, धनराज पवार यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. पुढील तपास उपनिरीक्षक एस. एस. रावते करीत आहेत.


























































