रोहयोवरील कामगारांची संख्या घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड काळानंतर जिह्यात रोजगार हमीवरील मजुरांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेलेली नाही. सध्या जिह्यात रोहयोवर 8 हजार 817 मजुरांची उपस्थिती असून, जिल्हा परिषद प्रशासनाने रोजगार हमीतून घरकुल बांधण्यास प्राधान्य दिले आहे. ग्रामीण भागातून शेतकऱयांकडून रोहयोतून गोठय़ांच्या कामाची मोठी मागणी आहे.

‘महात्मा गांधी रोजगार हमी योजने’द्वारे ग्रामीण भागात गरजूंना 100 दिवसांचा हक्काचा रोजगार दिला जातो. त्यानुसार जिह्यात रोहयोतून 2 हजार 89 कामे सुरू असून, यात जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाची 1 हजार 671, तर महसूल यंत्रणेच्या 418 कामांचा समावेश आहे. सुरू असणाऱया कामात घरकुलांची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. याशिवाय शोषखड्डे, रस्ता आणि फळबागा या कामांचा समावेश होता. जिह्यात सध्या ‘रोजगार हमी योजने’वर सर्वाधिक मजूर हे कर्जत आणि जामखेड तालुक्यातील आहेत, तर सर्वांत कमी मजूर हे श्रीरामपूर तालुक्यातील आहेत.

सरकारने ‘रोजगार हमी योजने’तून जलसंधारणविषयक सिमेंट नाला बांध, दगडी नाला बांध, गॅबियन बंधारे, शोषखड्डे, सार्वजनिक शोषखड्डे, सलग समतल चर, पाझर तलाव दुरुस्ती, जमीन सपाटीकरण, गाळ काढणे, वनीकरण, रस्ता दुतर्फा वृक्षारोपण, रोपवाटिका या पारंपरिक कामासोबत सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर, शेततळे, फळबाग लागवड, रेशीम उत्पादन, बांधावरील वृक्ष, घरकूल, सामूहिक गोठे, मत्स्यपालन, शौचालय, रस्ता खडीकरण, सिमेंट रस्ता, डांबर रस्ता, ग्रामसंघ इमारत, बाजार ओटा, स्मशानभूमी शेड, सार्वजनिक ठिकाणी सुशोभीकरण या कामाचा रोजगार हमी योजनेत समावेश केला आहे.

तालुकानिहाय रोहयोवरील मजुरांची उपस्थिती

 अकोले 317, जामखेड 1,454, कर्जत 1,351, कोपरगाव 289, नगर 604, नेवासा 889, पारनेर 518, पाथर्डी 820, राहाता 330, राहुरी 298, संगमनेर 747, शेवगाव 735, श्रीगोंदा 311 आणि श्रीरामपूर 154.