
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महायात्रेला प्रारंभ झाला असून, शुक्रवार, दि. 13 रोजी 68 लिंग तैलाभिषेक सोहळा होणार आहे. सकाळी बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाडय़ातून श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासह सात नंदिध्वज, 68 लिंग तैलाभिषेक व ग्रामप्रदक्षिणेस प्रारंभ होणार आहे.
हिरेहब्बू वाडय़ातील विधिवत पूजेनंतर नंदिध्वज प्रस्थान करणार आहे. सायंकाळी पुन्हा हे सर्व नंदिध्वज हिरेहब्बू वाडय़ात येणार आहेत. हिरेहब्बूवाडा, दाते गणपती मंदिर, खाटिक मशीद, कसबा चौक, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकष्टा, रिपन हॉल, सिद्धेश्वर मंदिर, संम्मती कट्टा असा प्रदक्षिणेचा मार्ग आहे.
या मिरवणूक मार्गावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून, नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आले आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून भाविकांच्या उपस्थितीवर निर्बंध होते. यंदाच्या वर्षी निर्बंध नसल्यामुळे भाविकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर उत्साह आहे.
महायात्रेकरिता दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त
यंदा महायात्रेला भाविकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. यात 5 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, 105 पोलीस निरीक्षक, 6 पोलीस निरीक्षक, 1271 पोलीस कर्मचारी, 700 पुरुष व महिला होमगार्ड याशिवाय गर्दी नियंत्रण पथक, घातपातविरोधी पथक, साध्या कपडय़ातील बंदोबस्त कर्मचारी, चोरटय़ावर निर्बंध व नियंत्रण ठेवणारे पथक याशिवाय लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत पथक तैनात करण्यात येणार असून, काही स्वयंसेवक, संघटनांचेही सहकार्य या बंदोबस्तादरम्यान घेण्यात येणार आहे.


























































