
कोरोनाच्या फैलावाने केंद्र सरकारच्या उत्पन्नावर मोठा आघात केला आहे. 15 सप्टेंबरपर्यंतच्या प्रत्यक्ष करवसुलीत 22.5 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. 2020-21 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत केवळ 2 लाख 53 हजार 532 कोटी रुपयांचा कर सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच सहामाहीत 3 लाख 27 हजार 320 कोटींची करवसुली झाली होती. आधीच अर्थव्यवस्था ढेपाळलेली असताना करवसुलीही निराशाजनक राहिल्याने मोदी सरकारची चिंता वाढली आहे.
मुंबईच्या प्राप्तीकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्य़ांनी बुधवारी कर वसुलीची ही आकडेवारी उघड केली. बंगळूरू वगळता दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या शहरांमध्ये करवसुलीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मुंबई आणि कोलकाता येथील करवसुलीत 13.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. महामारीचा सर्वाधिक फटका चेन्नईतील करवसुलीला बसला आहे. येथे गेल्या वर्षीच्या तुलनेत 37.3 टक्क्यांनी कर उत्पन्नात घट झाली आहे. तसेच राजधानी दिल्लीत 33 टक्क्यांनी करवसुली घटली आहे. अधिकाऱ्य़ांनी पुढील तिमाहीतील आगाऊ कराची आकडेवारी देण्यास नकार दिला. जूनला संपलेल्या पहिल्या तिमाहीत लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. त्यामुळे एकूण करवसुलीत 31 टक्क्यांची घसरण झाली. त्याचवेळी आगाऊ कर वसुली 76 टक्क्यांनी घटली. कोरोनाचा फैलाव अजून नियंत्रणात येत नसल्याने आर्थिक वर्षातील एकूण करवसुलीला जबरदस्त फटका बसण्याची चिन्हे आहेत.

























































