
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून विरोधकांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असून आयकर विभागाकडून आता थेट काँग्रेसच्या बँक खात्यांवरच डल्ला मारण्यात आला आहे. 210 कोटी कर थकबाकीचे प्रकरण आयकर अपिलीय न्यायाधिकरणाकडे प्रलंबित असतानाही कारवाईचे पाऊल उचलत आयकर विभागाने वसुलीपोटी काँग्रेसच्या बँक खांत्यातून तब्बल 65 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून मोदी सरकारचा हा लोकशाहीवर हल्ला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
आयकर विभागाने विविध बँकांना काँग्रेस आणि युथ काँग्रेसच्या विविध बँक खात्यातून एकूण 65 कोटी रुपये काढण्याबद्दल पत्र पाठवले, मात्र काँग्रेसने कर परतावा थकवण्याच्या आयकर विभागाच्या आरोपांविरोधात यापूर्वीच कर विवादांवर सुनावणी करणाऱया आयकर अपिलीय प्राधिकरण न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. असे असताना आयकर विभागाने काँग्रेसच्या खात्यातून परस्पर पैसे काढून लोकशाहीवर हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केला.
210 कोटींचा कर थकीत असल्याचा आरोप
काँग्रेसकडे 210 कोटी रुपयांचा कर थकीत असल्याचा आरोप आयकर विभागाने केला होता, मात्र देशातील राजकीय पक्षांना प्राप्तिकरातून सुट मिळालेली असताना 210 कोटींचा कर थकीत असल्याचे प्राप्तिकर विभाग म्हणूच कसे शकते, असा सवाल काँग्रेसने यापूर्वीच केला आहे. आयकर विभागाने काँग्रेसला 210 कोटी रुपयांची थकबाकी दर्शवणारी नोटीस पाठवली होती. याविरोधात काँग्रेसने आयकर अपिलीय न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. हे प्रकरण आता कायदेशीर वादाचा विषय आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत काही रक्कम सुरक्षा हमी म्हणून गोठवली गेली. याला लीएन मार्पिंग म्हणतात. असे असतानाही प्राप्तिकर विभागाने काँग्रेसच्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप माकन यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
आयकर विभागाने काँग्रेसला 210 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी नोटीस पाठवली. याविरोधात काँग्रेसने आयकर विभाग अपिलीय न्यायाधिकरणाकडे अपील केले. या प्रकरणाचा अंतिम निर्णय येईपर्यंत ते पैसे खात्यात पडून राहणार आहेत. न्यायालयाकडून खटल्याचा निकाल लागेपर्यंत काही रक्कम सुरक्षा किंवा हमी म्हणून गोठविली जाते. याला लीएन मार्पिंग खाते म्हणतात. काँग्रेसच्या बाबतीत ही रक्कम 115 कोटी रुपये इतकी आहे.
हा लोकशाहीवर हल्ला
कर भरण्याबाबतचे प्रकरण आयकर अपिलीय न्यायाधीकरणाकडे प्रलंबित असताना आयकर विभागाने काँग्रेसच्या खात्यातून परस्पर पैसे काढले. अशाप्रकारे कारवाई करून मोदी सरकारने लोकशाहीवर हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केला. ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे, असेही माकन म्हणाले. काँग्रेसचा न्यायिक प्रणालीवर पूर्ण विश्वास आहे. आमची बाजू आम्ही मांडत राहू, असे माकन यांनी स्पष्ट केले.
























































