मालिका विजय की बरोबरी, नव्या दमाच्या संघांमध्ये आज चौथ्यांदा जोरदार चुरस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच सामन्यांची मालिका असूनही केवळ टाइमपास म्हणून खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची आज खरी कसोटी लागणार आहे. दौरा अर्धवट सोडून ऑस्ट्रेलियाच्या जगज्जेत्या संघातील सहा खेळाडू मायदेशी परतल्यामुळे या स्पर्धेतला सारा थरारच नाहीसा झाला आहे. ग्लेन मॅक्सवेलने मायदेशी परतण्यापूर्वी केलेल्या शतकी धमाक्याने ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान कायम राखले गेले होते. त्यामुळे 1-2 ने पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे नव्या दमाचे खेळाडू मालिकेत बरोबरी साधण्यासाठी मैदानात उतरणार आहेत, तर हिंदुस्थानचा दमदार संघ मालिका जिंकण्यासाठी. युवा खेळाडूंच्या उपस्थितीत खेळल्या जाणार्या या सामन्यात कोणता संघ सरस ठरतो याकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे.

सहा महिन्यांनी टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. त्या स्पर्धेच्या तयारीसाठी पाच सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. पण वन डे वर्ल्ड कपनंतर अवघ्या चार दिवसांनी सुरू झालेल्या या स्पर्धेला ना जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाने गांभिर्याने घेतले ना हिंदुस्थानने. हिंदुस्थानने या स्पर्धेसाठी आपला युवा संघच निवडला. वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि श्रेयस अय्यर या तिघांनाच निवडले होते. उर्वरित सर्व खेळाडू ‘आयपीएल रत्न’ होती. हिंदुस्थानचे गांभीर्य पाहून ऑस्ट्रेलियानेही आपल्या संघातील स्टीव्हन स्मिथ, अॅडम झम्पा, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, सीन एबॉट आणि जोश इंग्लिस या सहा खेळाडूंना मालिकेच्या मध्यावरच मायदेशी परतण्याची परवानगी दिली. अर्धा संघ मायदेशी परतल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ विखुरला आहे.

आता हिंदुस्थानच्या संघात वन डे वर्ल्ड कप संघातील तीन खेळाडू आहेत, मात्र ऑस्ट्रेलियन संघात एकही खेळाडू नाही. सर्व दिग्गज मायदेशी परतल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दुसरीकडे श्रेयस अय्यर संघात आल्यामुळे हिंदुस्थानची ताकद आणखी वाढलीय. तिसरा सामना मॅक्सवेलने एकहाती जिंकून दिला होता. मात्र चौथ्या सामन्यात तो नसल्याचा परिणाम संघावर नक्कीच जाणवणार. हिंदुस्थानच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ दुबळा भासत असला तरी प्रत्यक्ष मैदानात त्यांची कामगिरी कशी असेल ते सामन्यावेळीच कळेल.

गेल्या तीन सामन्यांपैकी पहिल्या आणि तिसऱ्या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला आहे. सामने अत्यंत चुरशीचे होत आहेत, पण मॅक्सवेल, स्मिथ, स्टॉयनिस, झम्पा माघारी परतल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ दबावाखाली दिसणार, यात शंका नाही. या संधीचा हिंदुस्थानचा संघ नक्कीच फायदा उचलेल. यशस्वी जैसवाल, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव हे सारेच फॉर्मात आहेत आणि आता त्यात श्रेयस अय्यरची भर पडल्याने फलंदाजी आणखीनच मजबूत झालीय. पण अय्यरमुळे मधल्या फळीतील कुणाचा पत्ता कापला जाणार, हे कळू शकलेले नाही. दुसरीकडे गोलंदाजीत प्रसिध कृष्णा असो किंवा अर्शदीप सिंग किंवा आवेश खान कुणीच आपला प्रभाव दाखवू शकलेला नाही.