
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानने राजकोट कसोटी जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली. आता मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये होणार आहे. मात्र या कसोटी सामन्याला उपकर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मुकण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानी संघ बुमराहला विश्रांती देण्याची शक्यता असून त्याच्या जागी अक्षर पटेल किंवा मुकेश कुमार यांचा संघात समावेश होऊ शकतो. ‘क्रिकबझ’ने याबाबत वृत्त दिले आहे.
राजकोटमध्ये झालेल्या कसोटीत हिंदुस्थानी संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना हिंदुस्थानने पाहुण्या इंग्लंडचा 434 धावांनी दारुण पराभव केला. हिंदुस्थानच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. आता मालिकेतील चौथा सामना रांची येथे 23 फेब्रुवारीपासून सुरू होईल. हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी रोहितसेनेकडे आहे.
रांचीमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीत हिंदुस्थानच्या संघात दोन बदल होण्याची शक्यता आहे. बुमराहला विश्रांती देऊन त्याच्या जागी अक्षर पटेल किंवा मुकेश कुमार यापैकी एकाला संधी देण्यात येईल. तर दुसरीकडे केएल राहुलही या सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे तो दुसरा आणि तिसरा सामना खेळू शकला नव्हता.
केएल राहुल फिट झाल्यास अंतिम 11 खेळाडूंमध्ये त्याला नक्कीच संधी मिळेल. त्यामुळे रोहितला एका बॅटरला संघातून डच्चू द्यावा लागेल. सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनी पदार्पणाच्या लढतीत चांगली कामगिरी केल्याने त्यांची जागा जवळपास पक्की आहे. सरफराजने दोन्ही डावात अर्धशतक झळकावले, तर ध्रुव जुरेल याने पहिल्या डावात 46 धावांची उपयुक्त खेळी केली होती. दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यामुळे या दोघांना डच्चू देण्याचा प्रश्नच नाही.
केएल राहुलसाठी रोहित शर्मा रजत पाटीदार याचा बळी देऊ शकतो. कारण विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटीमध्ये पाटीदारच्या बॅटमधून धावाच निघालेल्या नाहीत. दोन कसोटीच्या चार डावात मिळून त्याला अवघ्या 46 धावा करता आल्या आहेत. राजकोट कसोटीच्या दोन्ही डावात तो खराब फटका मारून बाद झाला. त्यामुळे राहुल संघात आल्यास पाटीदारला आपली जागा गमवावी लागू शकते.






























































