
हिंदुस्थान आणि इंग्लंडचा संघ आज पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहे. दोन्ही संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लंडनच्या जगप्रसिद्ध लॉर्डस मैदानावर रंगणार आहे. सायंकाळी साडे पाच वाजल्यापासून हा सामना सुरू होईल. किंगस्टन ओव्हलवर झालेला पहिला सामना जिंकत हिंदुस्थानने मालिकेत 1-0 आघाडी घेतलेली आहे.
आजचा सामना जिंकल्यास हिंदुस्थानकडे 2-0 अशी विजयी आघाडी होईल. त्यामुळे वन डे मालिका आपल्या खिशात घालण्यासाठी रोहितसेना जोर लावताना दिसेल. तत्पूर्वी झालेली टी-20 मालिकाही हिंदुस्थानने 2-1 अशी खिशात घातली होती. त्यामुळे आजच वन डे मालिकेचाही निकाल लागू नये म्हणून इंग्लंडचा संघही बाह्या सरसावून मैदानात उतरेल. इंग्लंडने आज विजय मिळवल्यास मालिका 1-1 अशी बरोबरीत येईल आणि तिसरा सामना निर्णायक होईल.
टी-20 सह वन डे मालिकेतही हिंदुस्थानला पराभव करताना इंग्लंडच्या नाकीनऊ येत आहेत. गेल्या अकरा वर्षामध्ये इंग्लंडने फक्त एकदाच हिंदुस्थानविरुद्ध द्विपक्षीय वन डे मालिका जिंकलेली आहे. या दरम्यान हिंदुस्थानने इंग्लंडला पाच वेळा पराभवाचे पाणी पाजले आहे. गेल्या वेळी घरच्या मैदानावर झालेल्या वन डे मालिकेतही हिंदुस्थानने 2-1 असा विजय मिळवला होता.
बुमराहचा बळींचा ‘षटकार’ अन् ICC क्रमवारीत उलथापालथ; नंबर वन गोलंदाजाची खुर्ची गेली
अकराव्यांदा विजयासाठी सज्ज
दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 19 द्विपक्षीय वन डे मालिका खेळल्या गेल्या आहेत. यात हिंदुस्थानने 10 वेळा विजय मिळवला, तर इंग्लंडला फक्त सात वेळा विजय मिळवता आला. तसेच दोन वन डे मालिका अनिर्णित राहिल्या. त्यामुळे आता लॉर्डसवरील सामना जिंकत हिंदुस्थानला अकराव्यांदा विजयाची संधी आहे.
रोहित-बुमराहवर पुन्हा मदार
पहिल्या लढतीमध्ये जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजांना वेसण घालण्याचे काम केले होते. बुमराहने सहा विकेट्स घेत इंग्लंडला अवघ्या 110 धावांमध्ये गारद करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तर त्यानंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी एकही विकेट जाऊ न देता आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. रोहितने शानदार अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे लॉर्डसवरील सामन्यातही दोघांच्या कामगिरीवर हिंदुस्थानची मदार असणार आहे.
‘हिटमॅन’च्या षटकारामुळे चिमुरडी जखमी; फिजिओंची धाव, रोहितनेही भेट घेत दिले ‘गोड’ गिफ्ट




























































