देशातील कोरोना मृत्युदर घसरला

जगात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱयांचे प्रमाण हिंदुस्थानात सर्वात कमी आहे. हिंदुस्थानचा मृत्यूदर 1.5 टक्के आहे. 22 मार्चपासूनचा हा सर्वाधिक कमी मृत्यूदर आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांच्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनासाठी केंद्र, राज्य आणि पेंद्रशासित प्रदेशांच्या लक्ष्यकेंद्री प्रयत्नांचे हे फलित असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले.

एकीकडे हिंदुस्थानात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना मृत्यूदर सातत्याने कमी होत आहे. तसेच नव्या रुग्णांच्या संख्येतही घट दिसत आहे. कोरोनाविरोधातील लढय़ात हिंदुस्थानने गाठलेला हा मोठा पल्ला आहे. मे महिन्यात देशात देशातील मृत्यूदर 3.23 टक्के होता. त्यामध्ये घट होऊन तो दीड टक्क्यापर्यंत खाली आला आहे. मार्चपासूनचा हा सर्वात कमी मृत्यूदर आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

मागील 24 तासांत देशात 480 कोरोना मृत्यूंची नोंद झाली. सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मृत्यूदर 1 टक्क्यापेक्षाही कमी आहे. यामध्ये राजस्थान, झारखंड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, बिहार, ओडिशा, आसाम आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.

देशात प्रतिबंधासाठी प्रभावी रणनीती, मोठय़ा प्रमाणात चाचण्या, सरकारी आणि खासगी रुग्णालयात प्रमाणित मानक वैद्यकीय व्यवस्थापन यामुळे मृत्यू दरात घट झाल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या