
‘पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ची स्वप्ने पाहणाऱ्या मोदी सरकारला आज ग्लोबल हंगर इंडेक्सने जोरदार झटका दिला आहे. हिंदुस्थान भुकेपंगाल बनल्याची लाजिरवाणी बाब या जागतिक क्रमवारीत उघड झाली असून गरिबीत हिंदुस्थानने केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि म्यानमारलाही मागे टाकले आहे. आज ही यादी जाहीर होताच काँग्रेससह सर्वच विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलेले असतानाच सोशल मीडियावरही ‘मोदी है तो मुमकीन है’ या टॅगलाइनसह संताप व्यक्त होत आहे.
संयुक्त राष्ट्र, युनिसेफ आणि फूड अॅण्ड ऑग्रिकल्चर ऑर्गनायझेशनसह अन्य संस्थांची आकडेवारी, माहिती वापरून दोन स्वयंसेवी संघटनांनी तयार केलेला ग्लोबल हंगर इण्डेक्स आज जाहीर करण्यात आला. या इण्डेक्समध्ये हिंदुस्थानची सलग दुसऱ्या वर्षी घसरण झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी हिंदुस्थान 101 क्रमांकावर होता, तर यंदा 107 क्रमांकावर आहे.
इण्डेक्सला आधार काय?
ही जागतिक क्रमवारी तयार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना अन्नधान्याची कमतरता, मुलांचे कमी पोषण आणि देशातील बालमृत्यूचे प्रमाण याचा विचार करते. तर स्वयंसेवी संघटना अल्पपोषण, कुपोषण, बालकांची अपुरी वाढ आणि बालमृत्यूचे प्रमाण या गोष्टी विचारात घेतात.
मोदी सरकारवर टीका
काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतरच या इण्डेक्समध्ये हिंदुस्थानची घसरण झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी इतर गोष्टींपेक्षा कुपोषण आणि भूकबळी या विषयांवर बोलावे, असे ट्विट काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केले आहे. तर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोसिया यांनी पाच ट्रिलियनची स्वप्ने पाहणाऱ्यांना 106 देश आपल्यापेक्षा चांगले आहेत हे लक्षात घ्यावे लागेल, असे म्हटले आहे.
सोशल मीडियावर संताप
नेटकरीही संतापले आहेत आणि मोदी सरकारविरोधात मीम्सचा पाऊस पडू लागला आहे. एरव्ही देशात काहीही झाले तरी ‘मोदी है तो मुमकीन है’ची आरोळी ठोकणारे भक्त आताही तीच आरोळी देणार का, असा सवाल एकाने केला आहे. तर श्रेयवादाच्या लढाईत या घसरणीचेही श्रेय घ्या, असे दुसऱ्याने सुचवले आहे.
हिंदुस्थान आता लायबेरिया, झाम्बिया, रिपब्लिक ऑफ कॉन्गो, सिएरा लियोग, हैनी या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. पाकिस्तान 99, बांगलादेश 84, नेपाळ 81 आणि श्रीलंका 64 व्या क्रमांकावर असून अफगाणिस्तान 109 क्रमांकावर हिंदुस्थानच्या मागे आहे.




























































