पाकिस्तानी पंतप्रधान हिंदुस्थानात येणार ?

मे 2023 मध्ये शांघार्य सहकार्य परिषदेचे म्हणजेच एससीओचे शिखर संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी हिंदुस्थानने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांना आमंत्रित केले आहे. हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी या दोघांनाही निमंत्रित केले आहे. या दोघांच्या पाठोपाठ पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद यावर्षी हिंदुस्थानकडे असून यजमान या नात्याने हिंदुस्थानने पाकिस्तानलाही या संमेलनात सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले आहे. ही परंपरा असली तरी हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशातील कमालीचे ताणले गेलेले संबंध, पाकिस्तानचा कंगालपणा या पार्श्वभूमीवर हे आमंत्रण महत्त्वाचे मानले जात आहे.

कंगाली, आर्थिक संकट, मंदी, महागाई याच्या फेऱ्यात अडकलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हिंदुस्थानशी बाततचीत करण्यासाठी पाकिस्तान उत्सुक असल्याचे वारंवार म्हटले आहे. हिंदुस्थानसोबतचे संबंध आपल्याला सुधारायचे असल्याचे पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले होते. त्यांच्या या आवाहनामुळे हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी बुधवारी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री आणि सरन्यायाधीशांना हिंदुस्थानात येण्याचे निमंत्रण धाडले आहे. हे निमंत्रण हिंदुस्थानी उच्चायोगाने इस्लामाबादेतील पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाला दिले आहे. पाकिस्तानने या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे अथवा नाही हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.

पाकिस्तानने या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि पंतप्रधान किंवा त्यांचे परराष्ट्रमंत्री हिंदुस्थानात आले तर जवळपास 10 वर्षानंतर पाकिस्तानी मंत्री पहिल्यांदा हिंदुस्थानात येईल. यापूर्वी जुलै 2011 मध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार या हिंदुस्थानात आल्या होत्या. ऑगस्ट 2015मध्ये पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री सरताज अली यांना हिंदुस्थानने निमंत्रण पाठवलं होतं, मात्र अजीज यांना हुर्रीयत कॉन्फरन्सच्या नेत्यांनी विरोध केला होता, ज्यामुळे अजीज यांनी त्यांचा दौरा रद्द केला होता.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत करण्याची तयारी दर्शवली होती. आम्ही तीन युद्धातून योग्य तो धडा घेतला असून आता आम्हाला शांतता हवी आहे असे शरीफ यांनी म्हटले होते. हिंदुस्थान आमचा शेजारी देश असून आम्ही एकमेकांसोबत राहू इच्छितो असे ते म्हणाले होते. हिंदुस्थानसोबत युद्ध करून पाकिस्तानाच्या हाती अधिक कष्ट , गरिबी आणि बेरोजगारीशिवाय काहीच आले नाही असे ते म्हणाले होते.