Ind vs Aus जड्डूचा कमबॅक ‘पंच’, 5 महिन्यानंतर आला अन राडा घातला; टीम इंडियाने पाहुण्यांचा डाव 177 धावात गुंडाळला

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात आजपासून बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेला सुरुवात झाली. नागपुरात पहिली कसोटी खेळली जात असून यजमान हिंदुस्थानने पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाचा डाव पहिला डाव 177 धावात गुंडाळला. तब्बल 5 महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजा याने नागपुरात अक्षरशः राडा घालत विकेटचा ‘पंच’ ठोकला. आर. अश्विनने 3 विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब राहिलेल्या रवींद्र जडेजाने झोकात पुनरागमन केले आहे. नागपूर कसोटीतील पहिल्या डावात त्याने 22 षटकांच्या गोलंदाजी 47 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी करणाऱ्या लाबुशेन आणि स्मिथ यांना बाद करत जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यानंतर रेनशॉ, हँडस्कोंब आणि मर्फीला बाद करत त्याने विकेटचा पंच ठोकला.

ऑस्ट्रेलियाकडून एकाही फलंदाजाला साधा 50चा आकडाही पार करता आला नाही. मार्नस लाबुशेन याने सर्वाधिक 49 धावा केल्या, तर स्मिथने 37 धावांचे योगदान दिले. तर अॅलेक्स कॅरीने 36 आणि हँडस्कोंबने 31 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज 10 चा आकडाही पार करू शकले नाहीत.

आर. अश्विनचे वेगवान 450 बळी, अनिल कुंबळेचा विक्रम मोडला