..जेव्हा तिकिटांचे दर सेन्सेक्सप्रमाणे बदलतात

वानखेडेवर रंगलेल्या हिंदुस्थान-श्रीलंका सामन्याचे तिकीट मोठा वशिला लावल्यानंतरही पैशाने विकत मिळत नव्हत्या. यावरून तिकिटांची मागणी किती प्रचंड होती याचा अंदाज साऱयांनाच आला होता. मात्र आज सामना सुरू होताच काळाबाजारात तिकिटांचे दर अक्षरशः मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सप्रमाणे क्षणाक्षणाला बदलत असल्याने एक वेगळाच अनुभव आला. सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईची लोकल क्रिकेटप्रेमींनी खचाखच भरली होती आणि चर्चगेट स्टेशन असो किंवा मरीन लाइन्स. दोन्ही ठिकाणी काळय़ाबाजारात तिकीट विक्रीला उधाण आले होते. चक्क पाचपट दरात सामन्याची तिकिटे विकली जात होती. अडीच हजारांची दहा-बारा हजारांनी, पण हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळताच तिकिटांचा दर दोनेक हजारांनी वाढला. कारण फलंदाजीला मुंबईकर रोहित शर्मा उतरणार होता. तिकिटांचे वाढलेले दर एका क्षणात कोलमडलेसुद्धा. रोहित शर्मा दुसऱयाच चेंडूवर बाद झाला आणि तिकिटांचे दर पुन्हा दहा हजारांवर आले. एवढेच नव्हे तर काहींनी तीनपट दरातही तिकिटे विकायला सुरुवात केली. पण जसाजसा खेळ पुढे सरकू लागला, सामन्याची तिकिटे आपल्याच गळ्यात पडतील, या भीतीने ब्लॅकर्स अडीचचे पाच बोलू लागले. सामना सुरू होऊन 25 षटके झाली तरी शेकडो चाहते तिकिटांसाठी धडपडत होते. ब्लॅकर्सकडे भाव कमी करण्याची विनंती करत होते. मात्र गिल बाद होताच तिकिटांचे दर मुद्दल भावापेक्षा कमी झाले आणि विराटची विकेट जाताच ब्लॅकर्स उरलेली तिकिटे अर्ध्या किमतीत विकून आपले नुकसान कमी करण्यासाठी धडपडताना दिसले.

कॉम्प्लिमेंट्री तिकिटांचा काळाबाजार
आजच्या सामन्याची तिकिटे कुठेही मिळत नव्हती. मात्र काळय़ाबाजारात चक्क कॉम्प्लिमेंट्री ब्लॅकनी विकली जात होती. जी तिकिटे सन्माननीय लोकांना देण्यासाठी छापली गेली होती, अशी कॉम्प्लिमेंट्री तिकिटे मोठय़ा संख्येने काळय़ाबाजारात कशी विकली जात होती हा मोठा प्रश्न आहे. ब्लॅकर्सला याबद्दल विचारले असता, तो सरळ म्हणाला, तुला तिकीट पाहिजे असेल तर घे नाहीतर पुढे हो. तुला काय करायचेय, मला तिकिटे कुठून मिळाली. आमची ओळख वरपर्यंत आहे.