चेन्नईत हिंदुस्थान आज पहिल्या वनडेमध्ये विंडीजला भिडणार

636

टी-20 मालिकेत वेस्ट इंडीजला 2-1 असे पराभूत करणारा कर्णधार विराट कोहलीचा हिंदुस्थानी संघ उद्या चेन्नईतील पहिल्या वन डे लढतीत पाहुण्या विंडीजला विजयाच्या जबर निर्धाराने भिडणार आहे. तीन लढतींची ही मालिका जिंकून सलग मालिका विजयाचा वारू दौडता ठेवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. सलग दहावी आंतरराष्ट्रीय द्विसंघीय मालिका जिंकण्याचे ध्येय आता कोहली आणि कंपनीपुढे आहे. लढत दुपारी 1.30 पासून खेळवली जाणार आहे.

विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेआधीच हिंदुस्थानी संघाचा सलामीवीर शिखर धवन आणि प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे फलंदाजीची भिस्त सलामीवीर रोहित शर्मा, के. एल. राहुल, कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्यावर प्रामुख्याने असेल तर गोलंदाजीची भिस्त वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, दीपक चहर, अष्टपैलू रवींद्र जाडेजा, फिरकीवीर कुलदीप यादव यांच्यावर असेल. भुवनेश्वरऐवजी संघात निवड झालेला मुंबईकर शार्दुल ठाकूरची अंतिम संघात निवड झाल्यास त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.

विंडीजची मदार लुईस, पोलार्डवर
पाहुण्या विंडीजच्या फलंदाजीची मदार डावखुरा धडाकेबाज फलंदाज एव्हीन लुईस, कर्णधार कायरॉन पोलार्ड, शाय होप, शिमरन हेटमायर आणि निकोलस पुरन यांच्यावर असेल. तर गोलंदाजीत शेल्ड्रेन कॉट्रेल, माजी कर्णधार जेसन होल्डर यांना संघाच्या विजयासाठी जोरदार कामगिरी करावी लागेल.

संभाव्य प्रतिस्पर्धी संघ
 हिंदुस्थान – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयांक अगरवाल, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.

 वेस्ट इंडीज – कायरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील अम्बरीस, शाय होप, खारी पिअर, रोस्टन चेस, अलझारी जोसेफ, शेल्डन कॉट्रेल, ब्रँडोन किंग, निकोलस, शिमरन हेटमायर, जेवीं लुईस, रोमॅरिओ शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श (ज्युनियर)

आपली प्रतिक्रिया द्या