इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड, हिंदुस्थानच्या संघात मुंबईचे चार क्रिकेटपटू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या सीनियर क्रिकेट निवड समितीने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केली. यामध्ये मुंबईच्या चार क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला. रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव व शार्दुल ठाकूर या चार मुंबईकरांची हिंदुस्थानच्या संघात एण्ट्री करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा व फिरकी गोलंदाज कृणाल पांडय़ा यांनाही संधी देण्यात आली आहे.

सहा फलंदाज अन् दोन यष्टिरक्षक

हिंदुस्थानी संघात कर्णधार विराट कोहलीसह उपकर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिखर धवन व शुभमन गिल या फलंदाजांची निवड करण्यात आली आहे. तसेच रिषभ पंत व लोकेश राहुल हे दोन यष्टिरक्षक फलंदाजही टीम इंडियामध्ये आहेत.

चार वेगवान अन् दोन फिरकीवीर

टी. नटराजन, भुवनेश्वरकुमार, मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकूर हे वेगवान गोलंदाज संघात असून युजवेंद्र चहल व कुलदीप यादव या फिरकीवीरांना संघात चान्स देण्यात आला आहे. हार्दिक व कृणाल हे पांडय़ा बंधू व वॉशिंग्टन सुंदर यांच्या खांद्यावर अष्टपैलू कामगिरीची मदार असेल.

बुमराहची सुट्टी, शमी अजूनही फिट नाहीए
याआधी हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलियात वन डे मालिका खेळला होता. त्या संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मनीष पांडे, नवदीप सैनी, संजू सॅमसम, मयांक अग्रवाल या खेळाडूंचा समावेश होता. पण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी यांच्यापैकी एकालाही स्थान देण्यात आलेले नाही. जसप्रीत बुमराहने लग्नासाठी सुट्टी घेतली असून मोहम्मद शमी अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाहीए.

वन डे मालिकेसाठी हिंदुस्थानचा चमू
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांडय़ा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), लोकेश राहुल (यष्टिरक्षक), युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वरकुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

हिंदुस्थान – इंग्लंड
वन डे मालिकेचे वेळापत्रक
पहिली वन डे – 23 मार्च
दुसरी वन डे – 26 मार्च
तिसरी वन डे – 28 मार्च

(टीप – तिन्ही लढती पुण्यात रंगणार आहेत)