कॅनडातील हिंदुस्थानी नागरिकांनी सावध राहावे, केंद्र सरकारचा सतर्कतेचा इशारा

केंद्रातील मोदी सरकारने कॅनडातील रहिवासी असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारतर्फे कॅनडातील हिंदुस्थानी नागरिकांना सांगण्यात आलं आहे की, कॅनडात वाढत्या हिंदुस्थानविरोधी कारवाया आणि राजकीय पाठबळ असलेली हिंसा व तत्सम गुन्ह्यांकडे पाहता कॅडात राहणाऱ्या किंवा तिथे जाण्याचा विचार करणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांनी अतिशय सावध आणि सतर्क राहावं, असा सल्ला केंद्राने दिला आहे.

सध्या हिंदुस्थानी राजकीय व्यक्ती आणि हिंदुस्थानी नागरिक यांना लक्ष्य करणाऱ्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यात हिंदुस्थानविरोधी धोरणांचा निषेध करणाऱ्यांना विशेष लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे हिंदुस्थानी नागरिकांना हा सल्ला देण्यात येत आहे की, ते कॅनडातील त्या ठिकाणांवर प्रवास करू नये जिथे असे प्रकार घडत आहेत. तसंच, भारतीय उच्चायोग किंवा दूतावास कॅनडातील हिंदुस्थानी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कॅनेडियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असेल, असंही या अॅडव्हाजरीमध्ये सांगण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी कॅनडा सरकारने हिंदुस्थानात राहणाऱ्या कॅनेडियन नागरिकांनी अतिशय सावध राहावं असा सल्लावजा इशारा दिला होता. दहशतवादी हल्ल्यांचा धोका संभवत असल्याने हिंदुस्थानात राहणाऱ्या कॅनेडियन नागरिकांनी सतर्क राहावं, शक्य असल्यास हिंदुस्थानात प्रवास टाळावा, असा सल्लाही देण्यात आला होता. त्यावर केंद्र सरकारनेही कॅनडातील हिंदुस्थानी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.