
आम्हाला न्याय द्या म्हणून जंतरमंतरवर बसलेल्या कुस्तीपटूंच्या पाठीशी हिंदुस्थानचे अवघे क्रीडा जगत उभे राहिले आहे. ‘हम तुम्हारे साथ हैं’ म्हणत हिंदुस्थानी क्रीडापटूंनी कुस्तीपटूंना न्याय द्यावा आणि त्यांची चौकशीची मागणी त्वरित करावी, असे आवाहन दिग्गज खेळाडूंनी केल्यामुळे कुस्ती महासंघाचे वादग्रस्त अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लावलेला लैंगिक शोषणाच्या आरोपाचा मुद्दा आता देशव्यापी झाला आहे. त्यामुळे कुस्तीपटूंना लवकरच न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लैंगिक शोषणाप्रकरणी बृजभूषण यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांची चौकशी व्हावी म्हणून कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याप्रकरणी दोन दिवस विशेष काही न झाल्यामुळे आज अखेर अवघे हिंदुस्थानी क्रीडा विश्वाने आंदोलनाकर्त्या महिला कुस्तीपटूंना आपला पाठिंबा दर्शविला. हिंदुस्थानला भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून देणाऱया नीरज चोप्रापाठोपाठ वीरेंद्र सेहवाग, सानिया मिर्झा, इरफान पठाण तसेच सिद्धू या खेळाडूंसह अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, पूजा भट्ट आणि स्वरा भास्करही मैदानात उतरल्या आहेत.
आंदोलन महागात पडतेय…
कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरुद्ध पुकारलेले आंदोलन कुस्तीपटूंना आर्थिकदृष्टय़ा महागात पडू लागलेय. जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनासाठी आवश्यक वस्तूंसाठी त्यांना चांगलाच खर्च करावा लागतोय. या खर्चानंतरही कुस्तीपटू दिल्लीच्या या प्रसिद्ध आंदोलन स्थळावर दीर्घ लढाई करण्यासाठी तयार आहेत. आंदोलनकर्त्यांनी गेल्या पाच दिवसांत गाद्या, पंखे, स्पीकर, मायक्रोफोन, पाणी आणि खाद्यपदार्थांसाठी आतापर्यंत पाच लाख रुपये खर्च केले आहेत. त्यांना या गोष्टींसाठी दरदिवशी 27 हजार रुपये मोजावे लागत आहेत. जर हे आंदोलन असेच लांबले तर छाटय़ा-छोटय़ा गोष्टींची व्यवस्था करणे त्यांना आर्थिक अडचणीचे ठरू शकते.
कोण काय काय म्हणाले
नीरज चोप्रा – आमच्या खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागले ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यांनी देशासाठी अथक मेहनत करत पदके जिंकली आहेत. एक राष्ट्राच्या रूपात सर्व व्यक्ती मग तो खेळाडू असू किंवा सिनेस्टार, त्याच्या अखंडतेसाठी आणि सन्मानाची रक्षा करण्यासाठी आम्ही सर्व जबाबदार आहोत. जे होतेय ते कधीच व्हायला नको होते.
वीरेंद्र सेहवाग – ज्या खेळाडूंनी देशाचे नाव अभिमानाने उंचावलेय, झेंडा फडकवलाय, आम्हा सर्वांना आनंदाचे क्षण दिले आहेत त्यांचे रस्त्यावर उतरणे अत्यंत दुःखाची बात आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. मला विश्वास आहे, आमच्या कुस्तीपटूंना न्याय मिळेल.
सानिया मिर्झा – एक खेळाडू आणि एक महिला म्हणून मला हे पाहणे अत्यंत अवघड वाटतेय. त्यांनी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे आणि आम्ही सर्वांनी त्यांच्याबरोबर आनंद साजरा केला आहे. त्यामुळे आता वेळ आलीय त्यांच्यासोबत उभे राहण्याची. हे अत्यंत संवेदनशील प्रकरण असून गंभीर आरोप आहेत.



























































