
सामना प्रतिनिधी । उरण
अनैतिक संबधातून जन्माला आलेले बाळ निर्दयी मातेने झुडुपात फेकून पसार झाली होती. मात्र दैव बलवत्तर म्हणून रडणाऱ्या बाळाचा आवाज ऐकून येथून जाणाऱ्या कामगारांनी तेथे शोध घेतला असता त्यांना दोन दिवसाचे स्री जातीचे अर्भक तिथे भूकेने व्याकूळ होवून रडत असल्याचे दिसले. कामगारांनी ताबडतोब याची माहिती जवळच असलेल्या न्हावा शेवा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी त्या बाळाला जीवदान दिले आणि त्या निर्दयी मातेला दोन तासात शोधून काढले.
भुकेनं व्याकूळ झालेल्या एक दिवसाच्या अर्भकाला न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संदीप यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवदान दिल्याने सध्या सर्वस्तरावरून न्हावा शेवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतुक करण्यात येत आहे.
जसखार गावात दोन महिन्यांपूर्वी भाडेतत्त्वावर वास्तवात असलेल्या या महिलेच्या पोटी अनैतिक संबंधातून सोमवारी स्त्री जातीचे अर्भक जन्माला आले. मात्र या मातृत्वाबाबत समाज आपल्याला विचारणा करेल या विचाराने या महिलेने सदरचे बाळ फुंडे कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या पडीक इमारतीच्या परिसरातील झुडपांमध्ये टाकून दिले होते. भूकेने व्याकूळ झालेले हे लहान अर्भक रात्रभर थंडीत हंबरडा फोडत होते. मंगळवारी सकाळी या ठिकाणावरून जाणाऱ्या एका इसमाला सदर लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येताच या घटनेची खबर सदर इसमाने न्हावा शेवा पोलीस ठाण्याला दिली. न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदीप यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटना स्थळावर धाव घेऊन भुकेनं व्याकूळ झालेल्या लहान शिशूला तातडीने रूग्णालयात दाखल करीत या घटनेचा तपास सुरू करून बाळ झुडपात फेकून देणाऱ्या आईचा शोध घेतला. अवघ्या दोन तासात या महिलेला अटक केली. न्हावाशेवा पोलिसांचे या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


























































