इन्शुअर कोट, जिजाऊ अजिंक्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या दिमाखदार आयोजनामुळे संस्मरणीय ठरलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या व्यावसायिक गटात इन्शुअर कोटने भारत पेट्रोलियमचे कडवे आव्हान मोडीत काढत जेतेपदाला गवसणी घातली, तर महिलांच्या गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊने जेतेपद पटकावले. सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या आदित्य शिंदेला पुरस्कार रुपाने बाईक आणि सलोनी गजमलला स्कूटी देऊन गौरविण्यात आले.

कांजूर पूर्वेला परिवार मनोरंजन मैदानावर पार पडलेल्या अंतिम सामन्यात कबड्डीप्रेमींना कबड्डीचा सर्वोच्च खेळ पाहायला मिळाला. इन्शुअर कोट आणि भारत पेट्रोलियम यांनी अंतिम सामना असल्याने सावध सुरुवात केली. पूर्वार्धात पेट्रोलियमने पहिला लोण दिला. तरीदेखील पहिल्या डावात त्यांना 20-20 अशा समान गुणांवर समाधान मानावे लागले. उत्तरार्धात इन्शुअर कोटने जोरदार खेळ केला. त्यांना या सामन्यात एकही लोण नोंदविता आला नाही. तरीदेखील झटापटीच्या गुणांवर त्यांनी 7 गुणांनी बाजी मारत विजेते पदावर आपले नाव कोरले. उत्तरार्धात सूर सापडलेल्या आदित्य शिंदेने तुफानी चढाया करीत या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला चढाईत वैभव कांबळेची, तर पकडीत बदल सिंगची उत्तम साथ लाभली. भारत पेट्रोलियमच्या रिशांक देवाडिगा, अक्षय सोनी, गिरीश इरनाक यांचा जोश उत्तरार्धात थोडा कमी पडला.

महिलांचा अंतिम सामना चुरशीचा झाला. या सामन्यात अखेर राजमाता जिजाऊ संघाने शिवशक्तीला 30-29 असे चकवीत जेतेपदावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे  राजमाता जिजाऊ संघात दोन खेळाडू वगळता इतर सर्व खेळाडू कुमारी गटाचे होते. सलोनी, मंदिरा, ऋतुजा या कुमारी गटाच्या खेळाडूंनीच या स्पर्धेत संघाच्या विजयात उल्लेखनीय कामगिरी केली. शिवशक्तीने पहिल्या सत्रात 13-11 अशी आघाडी घेतली होती. दुसऱया सत्रात शिवशक्तीने आक्रमक खेळ करीत राजमाताचे 5 खेळाडू बाद केले. पण यानंतर मात्र बाजू फिरली. या राजमाताच्या शिलकी दोन खेळाडूंनी शिवशक्तीच्या खेळाडूची अव्वल पकड करीत सलोनी गजमलला संजीवनी दिली. तिने आपल्या चढाईत दोन गडी टिपत संघाला उभारी दिली. शेवटी राजमातावर होणारा लोण त्यांनी शिवशक्तीवर फिरविला. या अव्वल पकडीतील जादा गुणामुळे राजमाताचा विजय शक्य झाला.

याअगोदर झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात इन्शुअर कोटने आयकरचा 60-23 असा, तर भारत पेट्रोलियमने मिडलाईनचा 37-30 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. महिलांत राजमाता जिजाऊने स्वराज्यला 52-21 असे, तर शिवशक्तीने महात्मा गांधीला 31-15 असे नमवत अंतिम फेरीत धडक दिली होती.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण आयोजक आमदार सुनील राऊत, आमदार रमेश कोरगावकर, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत, राजेश्वरी रेडकर, विजय सोनावणे, माजी नगरसेवक उमेश माने, उपनगर कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष, माजी महापौर दत्ता दळवी, कार्याध्यक्ष सुधाकर घाग यांच्या उपस्थितीत पार पडला. विजेत्यांवर सुमारे सहा लाखांच्या रोख बक्षिसांचा वर्षाव करण्यात आलेल्या या स्पर्धेला खासदार राजन विचारे, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि सर्वांचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी सदिच्छा भेट दिली.

वैयक्तिक बक्षिसे

पुरुष विभाग – उत्कृष्ट चढाई – रिशांक देवाडिगा (बीपीसीएल), उत्कृष्ट पकड – बादल सिंग (आयएसपीएल), नितीन धनकड (मिडलाईन-रायगड), डावा मध्यरक्षक – अस्लम शेख (आयएसपीएल), उजवा मध्यरक्षक – नितीन देशमुख (मिडलाईन), डावा कोपरारक्षक – गिरीश इरनाक (बीपीसीएल), उजवा कोपरारक्षक – दादासो पुजारी (आयएसपीएल).

महिला विभाग– उत्कृष्ट चढाई – पूजा यादव (शिवशक्ती), पकड – प्रियांका मांगलेकर (जिजाऊ), चढाईपटू – याशिका पुजारी (स्वराज्य स्पोर्ट्स), डावा मध्यरक्षक ः साधना विश्वकर्मा (शिवशक्ती), उजवा मध्यरक्षक – ऋतुजा निगडे (जिजाऊ), डावा कोपरारक्षक– सायली जाधव (महात्मा गांधी), उजवा कोपरारक्षक – पौर्णिमा जेधे (शिवशक्ती)