अजुनि तेवतो ‘तो’ दिवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> विनायक

थॉमस अल्वा एडिसन यांना विजेच्या दिव्याचं श्रेय दिलं जातं त्याला अनेक कारणं आहेत. त्यांच्या पूर्वीही ‘इन्कॅडेसन्ट’ किंवा ‘ग्लो’ होणारा, सहज प्रज्वलित करता येणारा ‘तेजस्वी’ दिवा शोधण्याचे प्रयत्न सुरूच होते. हफ्रे डेव्ही, विल्यम सॉयर, अल्बन मॅन अशा अनेक संशोधकांना नव्या दिव्याची आस लागली होती. त्याचं संशोधन दिवसा सूर्यप्रकाशात नाही, तर रात्री कंदिलाच्या उजेडातच झालं असणार. कारण जगात सगळीकडेच तेलाचे मंद दिवे जरुरीपुरता प्रकाश निर्माण करत असत. रात्रीसुद्धा सूर्यप्रकाशासारखा ‘लख्ख’ प्रकाश देऊन रात्रीचा ‘दिवस’ करण्याची किमया मात्र या मंद तेवणाऱ्या ज्योतींमध्ये नव्हती. ती साध्य झाली विजेच्या बल्बने. 27 जानेवारी 1880 या दिवशी एडिसन यांना ‘बल्ब’चा एकाधिकार (पेटंट) मिळाला आणि त्यांनी वीज निर्मितीलाही सुरुवात केली. ‘पर्ल स्ट्रीन स्टेशन’ इथे बहुधा 1882 मध्येच रस्त्यावरचे ‘दिवे’ लागले आणि सर्वसामान्यांचं जीवन उजळलं ते आजतागायत! आपल्या मुंबईतही त्यानंतर लवकरच वीज आली, पण आधी देशातला पहिला बल्ब कोलकात्यात लागला. कारण तेव्हा ती ब्रिटिशांची राजधानी होती.

1867 च्या सुमारास सुरू झालेली विजेच्या दिव्यांची कहाणी पुढे विविध रूपं घेत रंगत गेली. आज जवळपास सगळय़ा जगाची रात्र विद्युत रोषणाईने झगमगलेली दिसते त्याचे जनक थॉमस एडिसनच. विजेच्या पहिल्या टिकाऊ बल्बचा शोध घेताना एडिसन यांना 2 हजार 774 वेळा अपयश आलं होतं असं म्हणतात. एकूणच अनेक संशोधनांच्या काळात आलेल्या अपयशाविषयी नंतर एडिसन यांनी म्हटलं, ‘‘संशोधनात मी 10 हजार वेळा अपयशी ठरलो नाही, तर कोणते 10 हजार मार्ग त्यासाठी योग्य नाहीत याचा मला शोध लागला!’’ इच्छाशक्ती अशी दुर्दम्य असायला हवी. एरवी साध्या अपयशाने ‘नर्व्हस’ किंवा ‘डिप्रेस’ होणाऱ्यांची संख्या पाहता एडिसन यांचा आशावाद हा वादळातलाही ‘दिवा’ ठरतो!

एडिसनचं जीवन ही अडथळय़ांची आणि यशस्वीतेची शर्यत होती. बाराव्या वर्षी एक कान गमावलेला हा मुलगा ‘काहीही शिकण्याच्या दृष्टीने मठ्ठ आहे’ असं त्याच्या एका मास्तरांचं मत होतं म्हणे! एडिसनचा विजेचा दिवा पाहायला ते मास्तर हयात होते की नाही, ठाऊक नाही, पण असते तर सर्वात जास्त डोळे त्यांचेच दिपले असते!

काचगोलकात उष्णता कोंडून त्यातून विजेच्या प्रवाहाद्वारे ‘प्रकाश’ निर्माण करण्याची कल्पना बेंजामिन फ्रॅन्कलिन यांनी विद्युत प्रवाहाचं प्रात्यक्षिक दाखवल्यापासून अनेकांच्या मनात रेंगाळत होती. फ्रॅन्कलिन यांनी पावसाळी वातावरणात पतंगाच्या दोरीला चाव्यांचा जुडगा बांधून त्यात ढगातल्या विजेचा ‘करंट’ कसा येतो ते पूर्वीच सिद्ध केले होते.

मात्र विजेची कृत्रिम पद्धतीने निर्मिती आणि त्यापासून प्रकाश योजना हा प्रवास सोपा नव्हता. एडिसन यांचे सुरुवातीचे बल्बही उष्णता सहन न होणाऱ्या ‘फिलॅमेन्ट’मुळे (बल्बमधली तार) चटकन जळून जात असत. त्यावर शेकडो प्रयोग करून शेवटी बांबूपासून बनवलेल्या ‘फिलॅमेन्ट’चा बल्ब आधी साडेचौदा तास आणि नंतर सलग 1 हजार 400 तास तेजस्वीपणे तेवत राहिला. अशा बल्बची निर्मिती सुरू झाली. रोज काही तास वापरले तर हे बल्ब अनेक वर्षे चालत असत. बल्ब लावण्यासाठीचं ‘सॉकेट’सुद्धा एडिसन यांनीच बनवलं. 1876 मध्ये ‘मेनलो पार्क लॅब’ म्हणून स्थापन झालेल्या त्या कंपनीला आता ‘एडिसन पार्क’ असंच म्हणतात. एकातून एक अशी अनेक संशोधनं एडिसन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. फ्लुरोसन्ट मशीन (एक्स -रे) इफ्रारेड रेडिएशन मोजणारं टेसिमीटर, कॅमेरा, चलतचित्राचा कॅमेरा अशा कितीतरी गोष्टी एडिसन तयार करत गेले. एका बॉक्सिंगच्या लढतीचं चित्रण त्यांनी केलं. 1921 मध्ये फिल्म ‘बोलायला’ लागल्यावर एडिसन यांनी ‘मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब’ स्वतःवर चित्रित केलं आणि 84 व्या वर्षी (1931) विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ‘‘आइन्स्टाईनच्या संशोधनाविषयी मी काही सांगू शकत नाही. कारण मला त्यातलं काही कळत नाही,’’ हे त्यांचं प्रांजळ मतही फिल्मवर रेकॉर्ड झालं! एडिसननंतर ऍडॉल्फे चेलेट यांनी इलेक्ट्रिक ‘बल्ब’चं आयुष्य वाढवण्याच्या दृष्टीने महान कामगिरी केली. त्यांनी ‘टंग्स्टन’ धातूची ‘फिलॅमेन्ट’ बल्बमध्ये बसवली. त्यामुळे तो दिवा हजारो तास तेवत राहण्यासाठी सक्षम झाला. 1901 मध्ये लावलेला कार्बन फिलॅमेन्टचा पहिला यशस्वी दिवा मात्र आजही अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातल्या लिव्हमोर येथे अव्याहत तेवत आहे! ओहायोमधल्या शेल्बी कंपनीचा हा बल्ब जतन करण्याचं काम ‘लिव्हमोर प्लीझेन्टन फायर डिपार्टमेंट’ करतं. सुरुवातीला 30 ते 60 वॉटचा असलेला हा बल्ब आता थोडा मंदावलाय (डीम झालाय). आधी होजकार्ट हाऊस, मग एका गॅरेजमध्ये आणि नंतर आताच्या जागी तो लावला गेला. हे शतायुषी किंवा ‘सेन्टेनिअल’ बल्ब असल्याचं 1972 मध्ये माइक डन्स्टन या पत्रकाराच्या लक्षात आलं. मग त्याची विशेष काळजी घेतली जाऊ लागली. 20 मे 2013 रोजी हा दिवा बंद झाल्याचं कॅमेऱ्यात नोंदलं गेलं, पण दोष दिव्याचा नव्हे तर त्याला होणाऱया वीज पुरवठय़ाचा होता (अमेरिकेतही वीज ‘जाते’ तर!). आता ‘सेन्टेनिअल बल्ब कमिटी’ त्याची काळजी घेते. जगात नंतर टय़ुबलाइट, फ्लुरोसन्ट, सोडियम व्हेपर, एलईडी असे अनेक विद्युत दीप उजळले असले तरी या शतायुषी दिव्याची कहाणी विलक्षणच. अमेरिकेला जाणारे किती जण हा दिवा पाहून येतात?