
राशीद खान आणि नूर अहमद या अफगाणिस्तानच्या फिरकीने राजस्थानचा 118 धावांत खुर्दा पाडल्यानंतर विजयी लक्ष्य फक्त एका फलंदाजाच्या मोबदल्यात 37 चेंडू राखत पार पाडले. हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात मोठा विजय ठरला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखत ‘प्ले ऑफ’च्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकले.
राजस्थानच्या 119 धावांचे लक्ष्य गुजरात सहज गाठणार हे निश्चित होते. त्यामुळे वृद्धिमान साहा आणि शुभमन गिलने कोणतीही घाई न करताना विजयाचा पाठलाग करणे पसंत केले. दहाव्या षटकांत गिल 35 चेंडूंत 36 धावा करून बाद झाला, पण त्यानंतर आलेल्या कर्णधार हार्दिक पंडय़ाने 15 चेंडूंत 3 षटकार आणि 3 चौकारांची बरसात करत सामना 14 व्या षटकांतच संपवला. हार्दिकने नाबाद 39 धावा केल्या, तर साहा 41 धावांवर नाबाद राहिला. 48 पैकी 39 धावा एकटय़ा हार्दिकनेच फटकावल्या.
तत्पूर्वी, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण तो निर्णय अपयशी सलामीमुळे चुकीचा ठरला. आज जोस बटलरनेही निराशा केली. त्यानंतर गेल्या सामन्यात घणाघाती शतक ठोकणारा यशस्वी जैसवालही धावबाद झाला. संजू सॅमसनने 20 चेंडूंत 30 धावा ठोकल्या खऱया, पण तो बाद झाला आणि सामन्याचा सारा नूरच पालटला. 2 बाद 60 असलेला राजस्थानला राशीद खान आणि नूर अहमदच्या फिरकीने सलग पाच धक्के दिले. त्यामुळे त्यांची 8 बाद 96 अशी दुर्दशा झाली. मधल्या फळीत पडिक्कल (12), अश्विन (2), रियान पराग (4), हेटमायर (7) आणि ध्रुव जुरेल (9) हे बाद झाल्यामुळे राजस्थानने 20 षटके संपण्याआधीच गुडघे टेकले. राशीदने 4 षटकांत अवघ्या 14 धावा देत महत्त्वाच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. नूरनेही आपल्या ऑफ स्पिनची कमाल दाखवत पडिक्कल आणि जुरेलला बाद केले. राशीदने 3 विकेट टिपत आपल्या बळींची संख्या 18 वर नेली तर शमीनेही एक विकेट घेत स्पर्धेत तितकेच विकेट मिळविले. मात्र राशीदपेक्षा 6 धावा कमी देणाऱया शमीने पर्पल कॅप आपल्या ताब्यात घेतली.




























































