वानखेडेवर आज स्टार वॉर; विजयासाठी मुंबई आणि बंगळुरू आमनेसामने

विजयासाठी झगडत असलेले मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या स्टार खेळाडूंच्या संघांमध्ये वानखेडेवर संघर्ष रंगणार आहे. आयपीएल आता मध्यावर येतोय, पण या दोन्ही संघांना अद्याप सूर न गवसल्यामुळे क्रिकेटप्रेमींना आपल्या स्टार खेळाडूंकडून फटकेबाजीची आशा आहे.

मॅक्सवेलचा पुन्हा झंझावात दिसेल

पाच महिन्यांपूर्वी मॅक्सवेलने याच वानखेडेवर नाबाद 201 धावांची अद्भुत खेळी साकारली होती. ऑस्ट्रेलियाची 7 बाद 91 अशी दारुण अवस्था असताना मॅक्सवेलने अफगाणी गोलंदाजांना पह्डून काढताना 21 चौकार आणि 10 षटकारांची आतषबाजी करत कर्णधार पॅट कमिन्सबरोबर 202 धावांची अभेद्य भागी रचत नवा विश्वविक्रम रचला होता. तोच मॅक्सवेलने आयपीएलच्या गेल्या पाच डावांत 1, 0, 28, 3, 0 अशा निराशाजनक खेळी केल्या आहेत. त्यामुळे मॅक्सवेल आपले सारे अपयश वानखेडेवर धुवून काढेल, या अपेक्षेने क्रिकेटप्रेमी त्याच्याकडे पाहात आहेत.

 

विजयासाठी दबावाचे ओझे

आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई इंडियन्स सलग तीन पराभवानंतर एक विजय नोंदवू शकला आहे तर बंगळुरूने विजयानंतर सलग तीन सामन्यांत हार पत्करली आहे. एका संघात विराट कोहली आणि दुसऱया संघात रोहित शर्मा हे दिग्गज असूनही संघाची अवस्था पाहून संघातील प्रत्येक खेळाडूवर दबावाचे ओझे आहे. दोन्ही संघांचे चाहते संघाच्या कामगिरीवर निराश आहेत. विराट कोहलीची बॅट जरी धावा ठोकत असली तरी त्यांचा संघ हरतोय. मुंबई इंडियन्सच्या बाबतीतही फार वेगळी परिस्थिती नाही. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाला आहेत. बंगळुरू पाचपैकी चार सामने हरलाय तर मुंबई चारपैकी केवळ एक सामना जिंकलाय. दोन्ही संघ विजयापेक्षा पराभवाच्याच अधिक जवळचे झाले आहेत. त्यामुळे दबावाचे ओझे झुगारून विजयाचा जुगार कोण जिंकतो ते वानखेडेवर कळेलच.

विदेशींचे अपयशच पराभवाला कारणीभूत

बंगळुरू संघाचा कर्णधारच विदेशी फाफ डय़ु प्लेसिस आहे आणि संघात ग्लेन मॅक्सवेल, पॅमरून ग्रीन हे दिग्गज सातत्याने खेळताहेत. पण या तिन्ही खेळाडूंचे अपयशच संघाच्या पराभवाचे खरे कारण आहे. डय़ु प्लेसिसच्या बॅटीला पाच सामन्यानंतरही धावा होत नाहीत. ग्रीनकडूनही अपयशाची मालिका कायम असल्यामुळे बंगळुरूची स्थिती दिवसेंदिवस खालावत जात आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा सारा भार रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा आणि हार्दिक पंडय़ावर आहे. पण रोहितचा अपवाद वगळता कुणाच्या खेळात सातत्य दिसलेले नाही.

सर्वांच्या नजरा विराटवर

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱया विराटच्या स्ट्राइक रेटवर अनेक बिनडोक मंडळी तुटून पडलेत. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या संघात स्थान पक्के असलेल्या विराटकडून आणखी एक दमदार खेळीची सारेच वाट पाहत आहेत. वानखेडेवर विराटची फलंदाजी पाहण्यासाठी चाहत्यांची नक्कीच गर्दी होईल. तसेच चाहत्यांना रोहितकडून चौकार-षटकारांची अपेक्षा आहे.

पंडय़ासूर्यकुमारकडूनही अपेक्षा

हार्दिक पंडय़ाकडे मुंबईचे नेतृत्व सोपविण्यात आले असले तरी तो कर्णधार आणि फलंदाज या दोन्ही भूमिकेत आतापर्यंत फारशी चमक दाखवू शकलेला नाही. सूर्यकुमारही पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर संघात परतलाय, पण त्याच्या झंझावाताची सारे आतुरतेने वाट पाहत आहेत. आगामी टी-20 वर्ल्ड कप संघात आपले स्थान पक्के करायचे असेल तर या दोघांना आपला खेळ उंचवावाच लागेल. अन्यथा त्यांच्यामागे अनेक युवा खेळाडू रांगेत आहेत आणि ते कधी त्यांचे स्थान डळमळीत करतील, हे त्यांना कळणारही नाही.