मतदान प्रकिया संथ करण्यामागे मोठे षडयंत्र; अंबादास दानवे यांचा आरोप

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार, राज्यातील पाणी टंचाई आणि ईव्हीएम सुरक्षेच्या मद्द्यावर मत मांडले. यावेळी त्यांनी सरकारच्या बेजबाबदार धोरणावरही टीका केली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे सत्ताधारी धिंडवडे काढत आहेत, असा आरोपही दानवे यांनी सरकारवर केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी झाले. या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरली आहे. या घटनेत मतदान केंद्रावरील अनागोंदीपणा, सरकार आणि निवडणूक आयोगाचा निष्काळजीपणा या गोष्टी प्रकर्षाने जाणावल्या. राज्यात तापमान 40 अशांवर असताना पिण्याचे पाणी आणि पंखा यांची सोय नसणे, मोबाईलबाबतचे नियम याबाबत सरकारचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. या सर्वांचा विचार केला तर यामागे मोठे षडयंत्र असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

राज्याचे निवडणूक आयुक्त यश चोक्कलिंगम आहेत. या आधी श्रीकांत देशपांडे आयुक्त होते. त्यांची बदली 29 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आली. त्यांची मुदत 30 एप्रिल रोजी संपत होती. 16 मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली आणि त्याआधीच देशपांडे यांची बदली करण्यात आली. निवडणुकीच्या आधी अशी बदली करण्यामागे आपल्या मर्जीतील ,बेपर्वाईने वागणार, सरकारला मदत करणारा आयुक्त हवा होता का, असा सवाल उपस्थित होत आहे, असेही दानवे म्हणाले.

सत्ताधाऱ्यांकडून विशेषकरून भाजपकडून पैसे वाटपाच्या घटना घडत होत्या. निवडणुकीच्या प्रचार संपण्यापूर्वी आपण भांडुपमध्ये गेलो होतो. त्यावेळी भाजप कार्यालयाकडून कोट्यवधींचे पैसे वाटण्यात येत होते. ही घटना आमच्या पक्षाच्या शिवसैनिकांनी उघड केल्यानंतर गृहमंत्री स्वतः तेथे आले होते. अशा प्रकारची कोणतीही भेट ठरली नसताना गृहमंत्री एखाद्या कार्यालयाला भेट देतात, यावरून या प्रकरणामागे मोठे काळेबेरे असल्याचे दिसून येत आहे. तसेच अशा घटना मुंबईत मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. भाजप आणि गद्दारांनी मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले आहे, असा आरोपही दानवे यांनी केला.

राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हातावर दोन बोटांना मतदान केल्याच्या शाईची खूण आहे. डाव्या हाताच्या तर्जनीला मतदान केल्यावर शाई लावण्यात येते. पण त्यांच्या तर्जनी आणि मधल्या बोटावर शाई आहे. त्यांनी मलबार हिल भागात मतदान केले आहे. जर निवडणूक अधिकारी मुख्य सचिवांच्या दोन बोटांना शाई लावत असतील, तर सर्वसामान्यांबाबत ते काय करत असतील, याचा अंदाज येतो, असेही दानवे म्हणाले. निवडणूकीच्या आधीच देशपांडे यांची बदली का करण्यात आली आणि पैसे वाटपाच्या घटनांकडे पोलीस आणि निवडणूक आयोगाने दुर्लक्ष का केले, याची चौकशी करण्याची गरज आहे, असेही दानवे म्हणाले. सत्ताधारी पक्षाला फटका बसण्याच्या शक्यतेमुळेच निवडणूक प्रक्रिया मुद्दाम संथगतीने राबवण्यात आली का, असा प्रश्न निर्माण होतो. ईव्हीएम सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. अनेक ठिकाणी एकाच व्यक्तीने तीन-चार वेळा मतदान केल्याच्या घटना घडल्या आहेत.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांचे वक्तव्ये तपासावी. त्यांनी 304 कलम लावल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांनी कलम 304 अ लावले आहे. एफआयर पाहिल्यावर त्यांनी पत्रकारांनी खोटी माहिती दिली आहे, असे दिसून येते. त्यानंतर त्यांनी एफआयआर बदलला असेल तर माहिती नाही. मात्र, त्यांनी मुद्दाम 304 अ लावले का असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच या गाडीला लायन्सेन्स नाही, नंबरप्लेट नाही. चालकाने मद्यसेवन केले होते. कल्याणी नगर भागात अनेक बेकायदा पब आहेत. तेथे अनेक विद्यार्थी जातात. 18 वर्षांखालील मुलांना मद्यविक्रीस बंद असताना त्यांना मद्य देण्यात आले. त्याची रसिटही आहे. पुण्यात असे अनेक बेकायदा पब आहेत, असेही दानवे म्हणाले.

ही गाडी बंळळूरूहून घेतली आहे.मार्चमध्ये तात्पुरते रजिस्ट्रेशन केले आहे. मात्र, त्यानंतर ऑफिशियल टॅक्स न भरता रजिस्ट्रेशन करण्यात आलेले नाही. त्यामुळे गाडीचालकानची ही जबाबदारी आहे. या प्रकरणात रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येते. तसेच त्या चालकाने परवाना मिळत नाही. त्याच्या वडिलांचा याचा हात असल्यास त्यांनाही तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र, असे असताना सत्ताधारी पक्षाचा आमदार रात्री तान वाजता पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव टाकतो का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्षाकडून कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त शोबाजी करतात. काही गुंडांना फटके मारून आपण हिरो आहे, असे भासवतात. मात्र, अशा गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करतात, असेही दानवे म्हणाले.

व्हाईट कॉलर लोकांना पाठिशी घालणाऱ्या आयुक्तांवर गृहमंत्र्यांनी कारवाई करण्याची गरज आहे. वेदांत हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी अशा बड्या उद्योजकाच्या मुलाची मस्ती आणि मुजोरपणा उतरवण्याची गरज आहे. अग्रवाल यांच्या कुटुंबियांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असतील, तर त्याचीही चौकशी करण्याची गरज आहे.

आता निवडणुका संपल्या असल्याने सरकारने राज्याच्या पाणीटंचाईच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक जिल्ह्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत पाणीसमस्या सोडवण्याची गरज आहे, असेही अंबादास दानवे म्हणाले.