क्रूर इसिस पुन्हा सक्रीय, आफ्रिकेच्या एका शहरात 50 जणांची डोकी उडवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफ्रिकेच्या मोजाम्बिक्यूतील एका शहरात गेल्या काही दिवसांपासून जणू स्मशान शांतता पसरलेली दिसत आहे. पाल्मा नावाच्या शहरातून लोक, शहर सोडून पळून जात आहेत. दहशतवादी संघटना ISISने (इसिस) या शहराचा ताबा घेतला आहे. इसिसने या शहरावर दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला.

2017 पासून उत्तरी मोजाम्बिक्यू मध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. आफ्रिकेतील प्रशासनाने यासंदर्भात प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले आहे की हा अत्यंत नियोजनबद्ध हल्ला होता आणि या हल्ल्यानंतर शहरातील हजारों लोक बेपत्ता आहेत. या हल्ल्यानंतर एक ब्रिटिश कॉन्ट्रॅक्टर देखील बेपत्ता आहे.

रिपोर्ट्सनुसार, फिल ज्या होटल कॉम्प्लेक्समध्ये उतरला होता त्याला दहशतवाद्यांनी घेरले होते आणि 50 जणांची डोकी कापली होती. यासह 17 गाड्यांवर गोळीबार देखील केला होता. 44 वर्षांच्या फिल मावेर त्यांचे भाऊ बिल म्हणाले की इतकं सांगू शकतो की, ‘माझा भाऊ त्या हॉटेलमध्ये होता ज्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.’

सामाजिक कार्यकर्ते एद्रियानो नुवुंगा यांनी एएफपीसोबत झालेल्या चर्चेत सांगितले की, पाल्मा मायनिंग शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात अफ्रिकेतील सगळ्यात मोठे नॅचरल गॅस फील्ड आहेत. 75 हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहराची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. काही लोक 180 किमी दूर म्युडा येथे पळून गेले. अनेक दिवस ते जंगलाच्या रस्त्याने चालले होते. अनेक मुलं आणि वृद्ध चालता चालता थकून बेशुद्ध पडत होते.

म्युडात स्थलांतरित झालेल्या एका स्थानिकाने एएफपी सोबत झालेल्या चर्चेवेळी सांगितले की, हल्ल्याच्या काही दिवस आधीच ते दहशतवादी तिथे आले होते. स्थानिकांना काही पैसे देऊन तिथे लपून राहिले होते. त्यानंतर पाल्माच्या मेन रोडवरून हल्ला करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र ते शक्य झाले नाही.

यूएनचे प्रवक्ते स्टीफन डुजेरिक म्हणाले आहेत की, पाल्मा मधील स्थितीमुळे आम्ही चिंतेत आहोत. 24 मार्च पासून इथे जबरदस्त हिंसाचार आहे आणि शेकडो लोक रस्त्यावरच मारले गेले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आम्ही दहशतवाद्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.