
राजधानी नवी दिल्लीत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केल्यानंतर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. इस्रायलच्या दूतावासावर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर विभागाने व्यक्त केल्यानंतर दिल्लीसह इस्रायलच्या दूतावासाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.
राजधानी दिल्लीत ठिकठिकाणी पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. इस्रायलचा दूतावास आणि परिसरात नजर ठेवण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांसह निम्नलष्करी दलाचे जवानही बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले आहे.
इस्रायलचे नागरिक 6 सप्टेंबरला नववर्ष साजरे करणार आहेत. या निमित्ताने दूतावासात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. याच गर्दीचा गैरफायदा घेत घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा दलाकडून हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने इस्रायलचा दूतावास, वाणिज्य दूतावास आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षा दल सतर्क आहे.




























































