हिमाचलमध्ये अडकलेल्या मुंबईतील १२ ट्रेकर्सची दोन दिवसांनंतर सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

उत्तराखंडमध्ये ‘चित्कुल ट्रेक’ करताना अडकून पडलेल्या १२ ट्रेकर्सची इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दिवसांनंतर सुखरूप सुटका केली. दुर्दैवाने त्यातील ३३ वर्षीय हर्षद आपटे या बदलापूरच्या ट्रेकरचा मृत्यू झाला. उंच पहाडांवर ऑक्सिजनअभावी श्वास गुदमरल्याने तो अत्यवस्थ झाला होता. त्याला खाली आणून रुग्णालयात नेण्यात आले; परंतु दाखल करण्यापूर्वीच त्याने अखेरचा श्वास घेतला होता.

पावसाळा सुरू झाला की ट्रेकर्स मंडळी देशभरात विविध ठिकाणी ट्रेकिंगसाठी जातात. त्यात दोन परदेशी ट्रेकर्सही होते. हा ट्रेक उत्तराखंडच्या संकरी येथून सुरू होऊन हिमाचलच्या किन्नौरमधील सांगला येथील ‘हर की दून’मार्गे चित्कुल येथे संपतो. हा उंच पहाडांचा मार्ग आहे.

ट्रेकिंगचा मार्ग अवघड होता आणि बर्फवृष्टी होत असल्याने या ट्रेकर्सना सुखरूप सोडवणे म्हणजे आव्हान होते. त्या परिस्थितीतही जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करून ट्रेकर्सना बारासुपा भागात गाठले. त्यांच्यामधील हर्षद आपटे हा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास घेणे कठीण झाल्याने अत्यवस्थ झाला होता. त्याला तातडीने तेथून खाली आणून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

कुळगाववर शोककळा

हर्षल आपटे हा बदलापूरमधील कुळगावचा राहणारा होता. त्याला ट्रेकिंगचा छंद होता. महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले त्याने सर केले होते. उत्तराखंडमध्ये तो पहिल्यांदाच ट्रेकिंगसाठी गेला होता. आपटे कुटुंबीयांचा एकुलता असलेल्या हर्षदच्या निधनाने कुळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

मुंबईहून जयेश लिमये, प्रशांत कापडे, प्रसाद नरसाळे, मयूरेश जोशी, मृण्मय जोशी, स्नेहा लोखंडे, कौशल महाजन, संजय शेट्टी, रीना वांगलीकर, हर्षद आपटे यांच्यासह १२ ट्रेकर्स ‘चित्कुल ट्रेक’साठी गेले होते.

ऋषिकेश येथील ‘गो हिमालयाज’ या ट्रेकिंग संस्थेने या ट्रेकचे आयोजन केले होते. ८ जूनला डेहराडून येथून ट्रेकला सुरुवात झाली. आठ दिवसांचा ट्रेक होता. ट्रेकर्ससोबत एक गाईड आणि दहा हमालही होते. गेल्या दोन दिवसांपासून ते सर्व बेपत्ता होते. त्यांचा काहीच संपर्क होत नव्हता. उत्तराखंड आणि हिमाचलदरम्यानच्या बारशूला पास येथे अडकून पडल्याचा त्यांचा ‘एसओएस’ संदेश इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा दलाला मिळाला तेव्हा त्यांना शोधण्यासाठी जवानांनी मोहीम हाती घेतली.