
सामना ऑनलाईन, बीड
ऊस बिलाची रक्कम मिळण्यासाठी बीड जिह्यातल्या जय महेश साखर कारखान्याच्या पवारवाडी, सावरगाव आणि तेलगाव येथील कारखाना प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर रसवंती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे साखर आयुक्त आणि जय महेश साखर कारखान्याचे प्रशासन चांगलेच नरमले. या आंदोलनामुळे येत्या 31 जानेवारीपर्यंत 15 डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या उसाच्या बिलांची थकीत रक्कम देण्यात येईल, अशी लेखी हमी प्रशासनाच्या वतीने आज देण्यात आली.
शिवसेनेच्या प्रवक्त्या-आमदार डॉ. नीलम गोऱहे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक ज्ञानदेव मुकणे, मंगेश तिटकारे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. दरम्यान, येत्या 25 जानेवारी रोजी सर्व साखर कारखान्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.
































































