नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या

477

नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात राजधानी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा तीव्र निदर्शने केली आहेत. यावेळी आंदोलकांनी तीन बसेसला आग लावली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत असताना विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यात अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

जामियाच्या विद्यार्थ्यांनी कालिंदी कुंज रोडवर नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन केले. त्याआधी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबाहेरही आंदोलन केले आहे. विद्यार्थ्यांनी जाळपोळ केल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे. न्यू फ्रेंड्स कॉलनीजवळ मथुरा रोडवरही आंदोलन करत विद्यार्थ्यांनी वाहतूक रोखली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे विद्यापीठाने पदवी आणि पदवी उत्तर परीक्षा पुढे ढकलून हिवाळी सुटी जाहीर केली आहे. आता सुटीनंतर विद्यापीठ 6 जानेवारीला सुरू होणार आहे. विद्यापीठातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून त्याच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अजीम अहमद यांनी सांगितले. 16 डिसेंबरपासून हिवाळी सुटी जाहीर करण्यात आली असून आता 6 जानेवारीला विद्यापीठ सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात शुक्रवारी संसदेपर्यत मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर आंदोलनाने तीव्र रुप धारण केले असून मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला आहे. पोलिसांनी रोखल्यावर विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. त्यात प्रसारमाध्यमांचे काही प्रतिनिधी जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 50 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या