‘जन आक्रोश यात्रा’ सुरूच राहणार; स्थगितीच्या निर्णयावर काही तासात घेतला यू-टर्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
JAN-AKROSH-YATRA-RAJSHTAN

कोरोना व्हायरसमुळे बाधित रुग्णांची जागतिक स्तरावरील वाढती संख्या लक्षात घेऊन राजस्थानमधील ‘जन आक्रोश यात्रा’ स्थगित करण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला होता. मात्र यात्रा स्थगितीचा हा निर्णय भाजपने काही तासात मागे घेतला.

कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करत विधानसभा मतदारसंघांमध्ये सार्वजनिक सभा घेण्याच्या आपल्या योजनेनुसार पुढे जातील, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, जन आक्रोश यात्रेबाबत काही संभ्रम होता जो आता दूर झाला आहे आणि जन आक्रोश सभा (बैठका) वेळापत्रकानुसार होतील.

यापूर्वी पक्षाने यात्रा स्थगित करण्याची घोषणा केली होती.

राजस्थानमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून, भाजपचे प्रमुख जे पी नड्डा यांनी 1 डिसेंबर रोजी शेतकरी आणि प्रशासनाशी संबंधित प्रश्नांवर अशोक गेहलोत सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसशासित राज्यात ‘जन आक्रोश यात्रा’ सुरू केली.

‘कोविड-19 प्रकरणांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजस्थानमधील जन आक्रोश यात्रा स्थगित केली आहे. भाजपसाठी, राजकारणात लोक प्रथम येतात. आमच्यासाठी लोकांच्या सुरक्षिततेला, त्यांच्या आरोग्याला प्राधान्य आहे’, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग नवी दिल्लीत यांनी सांगितले होते.

काही तासांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की यात्रा स्थगित करण्याबाबत काही संभ्रम होता पण जाहीर सभा सुरूच राहतील.

ते म्हणाले, ‘राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या कारभाराविरोधात भाजपच्या जनआक्रोश यात्रा 1 ते 14 डिसेंबर या कालावधीत झाल्या. या यात्रेअंतर्गत आम्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दोन कोटी लोकांपर्यंत पोहोचलो आहोत’, असे ते म्हणाले.

‘आतापर्यंत 41 विधानसभा मतदारसंघात जन आक्रोश सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कोरोना संदर्भातील नियमांमुळे काही गोंधळ होता. या संभ्रमामुळे यात्रा स्थगित करण्याबाबत निर्णय झाहीर करण्यात आला होता. पण आता आमच्या जाहीर सभा होतील’, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की सार्वजनिक सभांमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन केले जाईल आणि केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणताही सल्ला येईपर्यंत सभा सुरू राहतील.

जगभरात कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, जगभरात दहशत पसरवल्यानंतर कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे हिंदुस्थान सरकारही सतर्क होत सर्व राज्यांना कोरोनाचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधीना कॉंग्रसची भारत जोडो यात्रा रद्द करण्याची विनंती केली आहे. यामुळे काँग्रेसने यावर टिकेची झोड उठवली आहे.