
सीएसएमटी स्थानकात लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणाऱया प्रवाशांना काही तासांसाठी थांबायचे असल्यास आता हॉटेल शोधत बसण्याची काहीही गरज नाही. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्थानकानंतर आता मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलिशान पॉड हॉटेल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून जूनच्या मध्यापर्यंत ते कार्यरत होईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. येथे मुक्कामाचे 12 तासांकरिता अवघे पाचशे रुपये आकारण्यात येणार आहेत.
प्रवाशांची गाडी चुकल्यास किंवा मुंबईत काही तासांचा मुक्काम करायचा असेल अशांसाठी हे पॉड हॉटेल चांगले वरदान ठरणार आहे. पॉडमध्ये कॉमन एरियात मोफत वाय-फाय, लगेज रूम, प्रसाधनगृह, शॉवर रूम, वॉशरूम असतील तर पॉडच्या आत वैयक्तिक वापरासाठी टीव्ही, लहान लॉकर, आरसा, एअर कंडिशनर आणि एअर फिल्टर व्हेंट्स, वाचनासाठी दिवे यासारख्या सुविधा असतील. मेसर्स नम्मा एंटरप्राइजेस कंपनीकडून 10 लाख 7 हजार 786 रुपयांची लायसन्स फी आकारून पाच वर्षांसाठी हे कंत्राट दिले असून त्यात मध्य रेल्वेला 55 लाख 68 हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे.
- सीएसएमटीच्या लांब पल्ल्याच्या ट्रेन सुटणाऱया ठिकाणी 131.61 चौरस मीटर जागेवर हे पॉड्स हॉटेल उभारण्यात येत असून जूनपासून सेवेत येणार आहे. येथे सुमारे 50 पॉड्स उभारण्यात येणार असून वारंवार प्रवास करणारे प्रवासी, सिंगल ट्रव्हलर्स, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हज आणि स्टडी ग्रुपसाठी ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे.

























































