
>> जयश्री संगीतराव
रामावतारात शबरीची रामाप्रति असलेली भक्ती जशी प्रसिद्ध आहे तशीच रामाने शबरीची उष्टी बोरे खाऊन तिच्या भक्तीचे केलेले आदरातिथ्य किंवा तिच्या भक्तीची घेतलेली दखल हीसुद्धा रामाची जनतेप्रति असलेली मनातील भावनादेखील दाखवून देणारी आहे. भिल्ल समाजात जन्माला आलेली, रानावनात वाढलेली मुलगी मातंग ऋषीच्या सान्निध्यात आल्यावर तिच्या आयुष्यात झालेला आमूलाग्र बदल आणि श्रीरामाप्रति असलेली तिची भक्ती, श्रद्धा तिने केलेल्या रामाच्या प्रतीक्षेतून दिसून येते. माणसाने जन्म कोणाच्या पोटी घ्यायचा हे त्याच्या हातात नाही, पण घेतलेला जन्म कसा जगायचा नव्हे, तर मिळालेल्या जन्माचं सोनं कसं करायचं, याचं उदाहरण म्हणजे शबरकन्या शबरी.
“मी भिल्ल समाजाचा राजा शबरपोटी जन्मलेली शबरी. खरं तर माझं नाव श्रमणा, पण पित्याच्या नावावरून मी शबरी म्हणून ओळखले गेले. भिल्ल समाजाचा मुख्य म्हणजे राजा असल्यामुळे अवतीभवती कायम लोकांची रहदारी असायची. रानावनातील पशुपक्षी, झाडं, वेली, फुलं, पानं यांच्यात रमणारी मी बरोबरीच्या मुलामुलींमध्ये खूप रमायचे. फुलं गोळा करून हार बनवायचे, रानमेवा आणायचा आणि खूप खेळायचे असे माझे बालपण आनंदात जात होते. पशुपक्ष्यांची भाषा मला कळायची. तासन्तास ते माझ्याशी त्यांच्या भाषेत बोलायचे. सगळ्यांना नवल वाटायचे. कुणाची हत्या करायला, इजा पोहोचवायला मन कधी धजतच नव्हतं. एकदा डोंगरकडय़ावर उभी असताना ऋषीमुनींचा तांडा बघितला आणि हट्ट धरला, मलाही त्यांच्या बरोबर जायचंय. घरचे सगळे चिंतीत झाले. माझ्या पुनर्जन्माबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा एका ऋषींनी माझ्या पित्याला सांगितले की, एक अलौकिक आत्मा तुझ्या पोटी जन्माला आला आहे. ही पूर्वजन्मात एका राजाची पत्नी होती. एका कुंभमेळ्यात राजाराणी गेले असता राणीने ऋषीमुनींचा मंत्रोच्चार, पूजा, होमहवन बघितले. तिलाही त्यांच्यात सामील व्हावेसे वाटले, पण राजपणाला ते शोभणार नाही म्हणून राजाने तिला मनाई केली. राणी दुःखी झाली. ती त्रिवेणी संगमावर जाऊन उभी राहिली. तिने गंगामैयाला नमस्कार केला, तिची आराधना केली व हे माते, मला पुन्हा जन्म असा दे की, ज्यात मी ईश्वरभक्ती करू शकेन, असं म्हणून तिने स्वतला गंगार्पण केले. तिचाच हा पुनर्जन्म होऊन ती तुझ्या पोटी जन्माला आली आहे. हे माझं वर्तमान व भविष्य बघून मातापित्याने माझा लवकर विवाह करायचे ठरविले, जेणेकरून आपली लेक संसारात तरी रमेल असे त्यांना वाटले असावे. माझं लग्न ठरलं आणि माझ्या लग्नासाठी मेजवानी म्हणून पशुप्राण्यांचा बळी देणार हे कळलं. माझं मन व्यथित झालं. मला काही सुचेना. रात्री सारे झोपल्यानंतर मी त्या साऱयांना सोडून दिले, मोकळे केले आणि घरातून पळून ऋषिमुख पर्वतावर पोहोचले. तेथे हजारो ऋषीमुनी राहत होते. ध्यान, तपस्या, हवन करत होते. ते तपस्येला गेले असले की, मी त्यांची कुटी स्वच्छ करायचे. हे सारं मी स्वतला लपवून करत असले तरी पकडले जाण्याची भीती होतीच. एके दिवशी पकडले गेलेच.
मला परत जायला सांगण्यात आले. मी आत्मसमर्पण करीन, पण परत जाणार नाही, असे आत्मविश्वासाने सांगताच त्यांच्यातील एका ऋषींनी, मातंग ऋषींनी पुत्री म्हणून माझा स्वीकार केला आणि आपल्याबरोबर ठेवले. त्यांचे आध्यात्मिक संस्कार माझ्यावरही होऊ लागले. माझे दिवस आनंदात, समाधानात जाऊ लागले. मातंग बाबांचा अंतकाळ जवळ आला. एके दिवशी त्यांनी मला जवळ बोलावून सांगितले, मी आता देहत्याग करणार आहे. मला काही कळलंच नाही. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी नकळत बोलले, “बाबा, काय बोलताय? मग मी कुणासाठी मी जगू?” हे ऐकताच मातंग बाबा म्हणाले, “शबरी, अगं तू एवढय़ासाठी जन्माला आली नाहीस. तुझं कार्य अजून बाकी आहे. बरंच घडायचं आहे अजून तुझ्या हातून.” मला वाटलं, उगाच मला समजवायला बोलत असतील. मी ऐकत नाही म्हणून शेवटी त्यांनी सांगितलं, प्रभू श्रीरामाविषयी सांगितले. बाबा सारं सांगू लागले. बाळा दशरथसूत राम विष्णूचा अवतार असणार आहे, पण तो अजून जन्माला आलेला नाही. तो जन्म घेऊन तरुण वयात वनवासाला येईल. त्याच्या हरण झालेल्या पत्नीच्या शोधकार्यासाठी तुला त्याला सुग्रीवापर्यंत पोहोचवायचे आहे. तिथे त्यांना त्यांचा परमभक्त हनुमान भेटणार, जो सीतामाईपर्यंत प्रभूचा निरोप पोहोचवणार, त्यांना मार्ग दाखवणार. तेव्हाच तुला मुक्ती मिळेल. असं म्हणत बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला अन् देह त्यागला.
आता माझ्यासाठी जगण्याची एकच आस होती… श्रीरामाचे दर्शन! कधी मनात यायचं, विष्णूचा अवतार असलेले राम माझ्याकडे कशाला येतील? प्रत्यक्ष ईश्वरी अंश ते! त्यांना माझी गरज कशाला लागणार? पण बाबांवर माझा पूर्ण विश्वास होता. मी रोज कुटीसमोरचा मार्ग साफ करायचे, रस्त्यावर फुलापानांचा गालिचा करायचे. थंड पाणी भरून ठेवू लागले. वाटायचं, उन्हातून आल्यावर माझा प्रभू तहानलेला असेल, भुकेला असेल. म्हणून रानमेवा आणायचे. दिस सरू लागले. वय होत आलं, दृष्टी अधू झाली, पण मनी आस मात्र होतीच. त्याच्यासाठी जन्मले ते कर्तव्य तर पार पाडायचेच होते..
माझा दिस सरत नव्हता, रात जात नव्हती. असं वाटायचं, माझा डोळा लागला आणि प्रभू निघून गेले तर? मी रात्र रात्र जागू लागले. मुखात एकच नाव श्रीराम श्रीराम! मनात होतं की, रामाचं मुखदर्शन झाल्याखेरीज या कुडीतून प्राण जाणार नाही आणि तो सुदिन उगवला. कोणीतरी सांगावा आणला की, शबरीचा ठावठिकाणा पुसत कोणीतरी तेजस्वी युवक येत आहेत. कुठून कशी अंगात वीज संचारली कुणास ठाऊक! दूरवर दृष्टी टाकून जिवाच्या आकांताने बघते तो काय! प्रभू आपल्या भ्रात्यासह कुटीच्या दारात उभे. त्यांचं मुखकमल निमिषभरही नजरेतून हटू नये म्हणून डोळ्यांतलं पाणीही थोपवण्याचा प्रयत्न करू लागले. वर्षानुवर्षे वाट बघून थिजलेल्या डोळ्यांत लख्ख प्रकाश भरला. काय करू? आधी जलपान करू की खानपान? शेवटी कुटीतून फळांची भरलेली थाळी घेऊन आले. “प्रभू, आपल्याला आंबट, तुरट, किडलेली फळे मिळू नयेत म्हणून एक-एक बोर मी चाखून बघितलंय. त्याचा स्वीकार करावा.” माझ्या देवाने मोठय़ा प्रेमाने ती बोरे खाल्ली. माझ्या गुरूबाबांचा निरोप मी त्यांना सांगितला. सुग्रीवापर्यंत कसे पोहोचाल, तो मार्ग सांगितला. सीतामाईच्या शोधात माझ्यासारख्या भिल्लिणीचा हातभार लागावा यापेक्षा भाग्य ते काय!
माझ्या जन्माचं सार्थक झालं. माझा कार्यभाग आता संपला. प्रभूला म्हणाले,“देवा, आता मला मुक्ती द्या. आपल्या दर्शनासाठीच आजवर आत्मा या देहात होता.” प्रभूपर्यंत माझी विनवणी पोहोचली. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि या शबरीला मुक्ती मिळाली. एका गोष्टीची मात्र सत्यता पटली… प्रभूच्या चरणाजवळ पोहोचायला जात-धर्म, उच्चöनीच हे माध्यम नाही, तर तुमचं भाग्य, कर्म आणि तुमचा विश्वास, तुमची निष्ठा महत्त्वाची असते. म्हणून तर या भिल्ल समाजातल्या शबरीसाठी प्रभू रामचंद्र माझ्या कुटीत आले. मार्ग पुसणे हा तर बहाणा म्हणावा लागेल. मला मुक्ती देण्यासाठीच माझा प्रभू इथवर आला. धन्य झाला हा जीव… ही श्रमणा… ही शबरी…!
उष्टी बोरे देवा दिधली
म्हणून शबरीस बोल लागला
भाव माझ्या अंतरीचा
मात्र माझ्या देवा कळला





























































