
सामना प्रतिनिधी । बीड
कधी काळी गणपतीच्या राजुरी आणि वैद्यनाथाच्या परळी मधील राजकीय धग कधी शमली हे कोणाच्याच लक्षात आले नाही. काळाच्या ओघात मग एकमेकांना मदतीचा हात देण्यासाठी कधी राजुरी धावली तर कधी वैद्यनाथ धावले. पुन्हा एकदा परळी आणि वैद्यनाथाने श्री गणेशा केला. शनिवारी नारायण गडावर मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयदत्त क्षीरसागर हे एकाच गाडीतून राजुरीमध्ये दाखल होत नवगण गणपती समोर नतमस्तक झाले आणि राजकीय भुवया उंचावल्या गेल्या.
बीडचे राजकारण पक्षाच्या भिंती पार करून केले जात आहे. अशा राजकारणाला मोठी परंपरा लाभली आहे. वैद्यनाथाचे आणि नवगण राजूरीचे नाते स्नेहाचेच राहिले आहे. कधी काळी याच राजुरीतून स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी क्षीरसागर कुटुंबाच्या विरोधात रान पेटवले होते. काळाच्या ओघात ही धग शमली गेली आणि गरजेनुसार रसद दिली गेली. कधी राजुरी वैद्यनाथाच्या मदतीला तर कधी वैद्यनाथ राजुरीच्या मदतीला धावले. या परंपरेला उजाळा देण्याचे काम पुन्हा एकदा सुरू झाले आहे. शनिवारी पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांनी समर्थकासह राजुरीच्या गणपतीला आरती करून नवगण गणपती समोर नतमस्तक झाले. त्यावेळी जाणकारांमध्ये हाच विषय चवीने रंगला जात होता.

































































