
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 15 व्या हंगामातून अनेक स्टार खेळाडूंनी माघार घेतली आहे. यात इंग्लंडचा अव्वल वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचेही नाव हेते. मात्र आता आर्चरने आता यू टर्न घेतला असून आयपीएलच्या लिलावासाठी त्याने नावनोंदणी केली आहे.
हाताच्या कोपराला दुखापत झाल्याने जोफ्रा आर्चर प्रदीर्घ काळापासून मैदानावर उतरू शकलेला नाही. जायबंदी असल्याने 2021च्या आयपीएललाही तो मुकला होता. आता आयपीएलच्या 15व्या हंगामाच्या लिलावासाठी जोफ्रा आर्चरने दोन कोटी रुपयांच्या आधारभूत किमतीवर नावनोंदणी केली असली तरी यावेळी तो खेळणार नाही. ‘बीसीसीआय’ने याबाबत सर्व फ्रँचाईजींना अवगत केले आहे. आर्चर 2023 व 2024 च्या आयपीएलमध्ये खेळेल, असे इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला कळवले आहे. जोफ्रा आर्चरने 2018 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, मात्र यावेळी या संघाने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता.




























































