
जोगेश्वरी पूर्वेकडील श्यामनगर येथील लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलावातील कृत्रिम तलाव व्यवस्थापनात पालिकेने निष्काळजीपणा केला. गंभीर त्रुटींमुळे तरुणाचा हकनाक बळी गेला, असा आरोप करीत शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी सखोल चौकशीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तरुणाच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार नर यांनी पोलीस उपआयुक्तांकडे केली आहे.
गणेश विसर्जनादरम्यान विजेचा शॉक लागून रोहित राठोड या तरुणाचा मृत्यू झाला. रोहितच्या अपघाती मृत्यूमागील कारणे शोधावीत, तसेच संबंधित अधिकारी, कंत्राटदार किंवा अन्य जबाबदार व्यक्तींची भूमिका तपासावी आणि रोहित राठोडच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, असे आमदार नर यांनी पोलीस उपआयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. रोहितसारख्या बळी गेल्यांनतर त्याच्या कुटुंबीयांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही सहानुभूती दाखवली नाही. उलट उपायुक्त (परि-3) हे खेळांच्या स्पर्धांमध्ये मश्गुल होते. रोहितच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली विजेची जोडणी संबंधित विभागाच्या मंजुरीशिवाय घेतल्याचे समजते, असे नर यांनी नमूद केले आहे.
मर्जीतल्या कंत्राटदाराला वेगवेगळय़ा कामांची कंत्राटे
लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलावावर अनुभवी ठेकेदारांऐवजी वरिष्ठ अधिकाऱयाच्या मर्जीतल्या प्रतीक सुतल नावाच्या ठेकेदाराला वेगवेगळय़ा कामांची कंत्राटे देण्यात आली. एकाच ठेकेदाराला कामे दिली, मग वेगळी निविदा काढण्याची गरज काय? कंत्राटदाराची मर्जी राखताना सुरक्षेबाबत हयगय करण्यात आली, मूर्तींची विटंबना होऊन गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या. याला सर्वस्वी जबाबदार के/उत्तर विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहेत, असा आरोप आमदार नर यांनी केला आहे.
























































