भाजपच्या मुख्यमंत्र्यांविरोधात व्हिडीओ पोस्ट, त्रिपुरात पत्रकाराला बेदम मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्या विरोधात फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून पत्रकाराला बेदम मारहाण केली आहे. आगरतळा येथील या घटनेने खळबळ माजली आहे.

कोरोना काळात अपुऱया वैद्यकीय सुविधा असल्याबद्दल पत्रकारांनी बातम्या प्रसारित केल्या. यामुळे भाजपचे मुख्यमंत्री बिप्लव देव भडकले. त्यांनी पत्रकारांना बघून घेऊ, माफ करणार नाही अशी धमकी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यावर त्रिपुरातील बंगाली वृत्तपत्राचे पत्रकार पाराशर बिस्वास यांनी व्हिडीओद्वारे मुख्यमंत्रांच्या धमकीवर नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे पाराशर यांना कोरोनाची लागण झाली होती. कोविड केअर केंद्रातून बरे झाल्यानंतर त्यांनी तेथील परिस्थितीवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना धमकावू नये. मी आज व्हिडीओ पोस्ट करीत आहे. यानंतर पुन्हा पोस्ट करेन असे पत्रकार पाराशर बिस्वास यांनी म्हटले होते. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी घरात घुसून बिस्वास यांना बेदम मारहाण केली.