पत्रकाराची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी, भिवंडी

काशिमीरा येथील पत्रकार नित्यानंद पांडे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह तालुक्यातील भिवंडी – वसई रोडवरील खार्डी गावात एका नाल्यात आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काशिमीरा येथून प्रकाशित होणाऱ्या ‘इंडिया अनबाऊंड’ या साप्ताहिक वृत्तपत्र व मासिकाचे ते संपादक होते.

मीरा रोड येथील काशिमीरा भागात राहणारे नित्यानंद पांडे हे शुक्रवार, 15 मार्चपासून बेपत्ता होते. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात पांडे बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. मात्र भिवंडी तालुका पोलिसांना खारबाव रोडकरील खार्डी या गावातील खड्ड्यात अनोळखी मृतदेह हत्या करून फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ठाणे ग्रामीण क्षेत्रातील पोलीस ठाण्यात तपास सुरू केला असता पांडे यांचे वर्णन त्या मृतदेहाशी मिळते-जुळते असल्याने त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह ओळखण्यास बोलवले असता ते नित्यानंद पांडे असल्याचे स्पष्ट झाले.