गंगेत विहार करायला जायचंय… मग आधी हे वाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत. यामुळे तुम्ही जर उत्तर प्रदेशात फिरायला जायचा आणि तिथे गंगा नदीत विहार करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण येथील प्रयागराजमध्ये गंगा विहार करण्यासाठी सहकुटुंब गेलेल्या एका न्यायाधीशांना पैशांसाठी एका नाविकाने गंगेच्या मधोमध बुडवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज कुमार असे या न्यायाधीशांचे नाव आहे. त्यांनी नाविकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस नाविकाचा शोध घेत आहेत.

न्यायालयाला दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने चंपारण येथील न्यायालयात न्यायाधीश असलेले राज कुमार सहकुटुंब प्रयागराज येथे गेले होते. गंगा नदीचे सौंदर्य बघून त्यांच्या कुटुंबीयांनी गंगेत विहार करण्याचे ठरवले. त्यानंतर एका नाविकाने त्यांना गंगा विहारासाठी नेण्याची तयारी दर्शवली. नाविकाला योग्य ते भाडे देऊन कुमार व त्यांचे कुटुंब व इतर बोटीत बसले. सगळेजण गंगा विहारचा आनंद घेत होते. त्याचवेळी अचानक नाविकाने कुमार यांच्याकडे पैशांची मागणी केली. पाच हजार रुपये द्या नाहीतर सगळ्यांना नदीत बुडवेन असे तो म्हणाला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे सगळेजण घाबरले. कुमार व त्यांच्या मुलाने नाविकाला पोलिसाची धमकी देत बोट पुन्हा किनाऱ्यावर नेण्यास सांगितले. हे बघताच नाविकाने बोट एका बाजूने कलंडवली. यामुळे काहीजण पाण्यात पडले. त्यानंतर नाविकाने बोट पुन्हा सरळ केली व तो कुमार यांच्याकडे पुन्हा पैसे मागू लागला. शेवटी कुमार यांनी त्याच्या हातात 200 रुपयाची नोट कोंबली. त्यानंतर नाविकाने बोट किनाऱ्यावर आणली व तो पळून गेला. नंतर कुमार यांनी पोलिसांना फोन करून बोलावले.