कालेच्या कुस्ती मैदानात विलास डोईफोडेने विजय धुमाळला घुटना डावावर दाखवले आस्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कराड

काले (ता. कराड) येथे श्री व्यंकनाथ देवाच्या यात्रेनिमित्त काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील मित्र परिवाराच्या वतीने झालेल्या जंगी कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या उपमहाराष्ट्र केसरी विलास डोईफोडे विरुध्द विजय धुमाळ यांच्यातील कुस्तीने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विलासने दोन ते तीनवेळच्या घुटना डावांना हुलकावणी देणारया विजयला अखेरीस त्याच डावाने चितपट केले. विजेत्या विलास डोईफोडेला सर्जेराव निकम यांच्या स्मरणार्थ 1 लाख 51 हजार व इंद्रजीत चव्हाण यांच्या सौजन्याने व्यंकनाथ केसरी किताब देण्यात आला. मैदानामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील हजारो प्रेक्षकांनी उच्चांकी गर्दी केली होती.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, महानंदाचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, जयसिंगराव कदम, अॅड. आनंदराव पाटील, संजय जगदाळे, प्रदिप थोरात, कराड तालुका अध्यक्ष मनोहर शिंदे, राजेंद्र उर्फ आप्पा माने, प्रकाश पाटील, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, इंद्रजीत चव्हाण, पैलवान धनाजी पाटील, अॅड. नरेंद्र पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, येरवळेचे सरपंच सुभाषराव पाटील, कोयना वसाहतचे सरपंच राजेंद्र पाटील, बाळासाहेब गलांडे, उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, उमेश साळुंखे, वैभव थोरात यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन संतोष दोरवडने समीर देसाईला घुटना डावावर पराभूत केले. त्याला रामचंद्र बाजीराव यादव यांच्या सौजन्याने 1 लाख 1 रुपये ईनाम व नामदेव पाटील यांच्याकडून सत्यजीत केसरी किताब देवून गौरविण्यात आले. विक्रम पारखे विरुध्द दत्ता नरळे यांच्यात अटीतटीची लढत झाली. विक्रमने एकलंगी डावावर दत्तावर मात केली. संभाजी कळसे विरुध्द आबा रास्कर यांच्यातील कुस्ती बरोबरीत झाली. तर अमर पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या कुस्तीने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तर शशिकांत बोर्गार्डे, असिफ शेख, अनिरुध्द पवार, विवेक पाटील, अविनाश वरपे, रितेश चोपडे, दत्ता बनकर, दिग्विजय जाधव, बाला इनामदार, महेश साळुंखे, रोहित शेवाळे, सुशांत साळुंखे यांच्यासह मल्लांनी चटकदार कुस्त्या केल्या. मैदानात हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ यांना कुस्तीभूषण, नामदेव पाटील यांना आदर्श उद्योजक, सुभाषराव पाटील यांना आदर्श सरपंच, सचिन पाचुपते यांना कुस्तीप्रेमी तर विजय पाटील व दिनकर थोरात यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देवून आ. चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्रथम दहा विजेत्यांना मल्लांना व्ही. जी. थोरात एजन्सीकडून कायमस्वरुपी चषक देण्यात आली. ऑलिंपिकवीर बंडा पाटील, उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, आनंदा धुमाळ, हणमंतराव जाधव, विनायक पाटील, जयकर खुडे, सचिन बागट, प्रमोद पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. ईश्वरा पाटील, सुरेश जाधव, पवन पाटील, आनंदराव जानुगडे यांनी उत्कृष्ठ समालोचन केले. मैदानाच्या यशस्वीतेसाठी पैलवान नानासाहेब पाटील मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.