
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेता करण ऑबेरॉयवर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी करणला तुरुंगाची हवाही खावी लागली आहे. करणला शुक्रवारी जामीन मिळाल्याने त्याला दिलासा मिळाला आहे. परंतु ज्या महिलेने करणवर बलात्काराचा आरोप केला आहे ती महिला अघोरी विद्या,काळ्या जादूमध्ये स्वत:ला पारंगत असल्याचं सांगते. या काळ्या जादूसाठी ती वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनेही विकत असून ती काळी जादू कशी कराययची याचे क्लासेसही घेते असा दावा एका तिच्याच अनुयायाने केला आहे. या क्लाससाठीचे शुल्क लाखांच्या घरात असल्याचंही या अनुयायाने म्हटले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. या महिलेच्या एकेकाळच्या अनुयायाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की सदर महिला ही काळी जादू करते. त्यासाठी मानवी कवटी, मृत व्यक्तींची नखं यांचा वापर करते. तसेच काळ्या जादूसाठी या वस्तूंची विक्रीही करते. या वस्तू मिळवण्यासाठी ती देशभर फिरत असते.
या महिलेच्या अनुयायाने दिलेल्या माहितीनुसार ही महिला काळी जादू करतेच शिवाय ती कशी करावी याचे प्रशिक्षण देते तसंच काळ्या जादूसाठीचं सामानही विकते. ही महिला एका व्यक्तीकडून 80 हजार ते दीड लाख रुपये शुल्क वसूल करते असंही या अनुयायाचे म्हणणे आहे. ही महिला अॅपवर काळ्या जादूची लाईव्ह प्रात्यक्षिकेही दाखवत होती तसेच तिने काळ्या जादूसंदर्भात पुस्तकही लिहिले आहे असं या अनुयायाने सांगितलं आहे.
अनेक व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये जे लोक तिच्या कामात रस घेत नाही किंवा लक्ष देत नव्हते ती त्यांना शिव्या घालायची त्यांना ग्रुपमधून काढून टाकायची. तसेच या लोकांशी कुणीच संबंध ठेवू नये असे ती ग्रुपमधील इतर लोकांना सांगायाची. ही महिला इतरांना सांगायची की कोणत्याही व्यक्तीला वश करता येऊ शकेल अशी तिच्याकडे उत्पादने आहेत. या उत्पादनांमध्ये पावडर, तेल यांचाही समावेश आहे. त्याचा वापर केल्यास सोडून गेलेल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला परत मिळवता येते असा दावा ही महिला करायची असं तिच्या अनुयायाचे म्हणणे आहे. घटस्फोट घडवून आणण्यासाठी आपल्याकडे मेणबत्याही असल्याचं ही महिला सांगायची. ज्या व्यक्तीवर तुमचे प्रेम आहे त्याचा घटस्फोट घडवण्यासाठीही या मेणबत्यांचा वापर करता येतो असं ही महिला सांगायची अशी माहिती तिच्या अनुयायाने दिली आहे.























































