
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना आहे. आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असे विधान बोम्मई यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती वरचढ ठरत असल्याने बोम्मई यांनी हुबळी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात टीका केली. मात्र, त्यांनी संघटनेला उचापती लोकांची संघटना म्हटल्याने जनतेने त्यांच्या या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद बेळगाव आणि महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हुबळी येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना बोम्मई यांनी समितीबाबत वादग्रस्त विधान केले. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येत एकच उमेदवार दिला आहे. त्यामुळे समितीकडून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे राहिले आहे. समिती वरचढ ठरत असल्याने यावर टीका करताना बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. महाराष्ट्र एकीकरण समितीला त्यांनी उचापती संघटना म्हटले आहे. आम्ही त्यांचा बंदोबस्त करू. बेळगावातील जनताच समितीला पाच वर्षे घरी बसवेल, असेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुकीत जनतेची माथी बिघडविण्याचे काम करत आहे. बेळगावच्या जनतेला हे सर्व ठाऊक आहे. त्यामुळे बेळगावची जनता त्यांना चोख उत्तर देईल, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय पक्षाच्या प्रचारासाठी कर्नाटकातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात बोलावले जात आहे. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचारासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली आहे. समिती पुन्हा एकदा वरचढ ठरत असल्याने बोम्मई यांनाही समितीवर टीका करावी लागली. मात्र, त्यांनी समितीला उचापती लोकांची संघटना म्हटल्याने वाद होण्याची शक्यता आहे. बेळगाव आणि महाराष्ट्रातील जनतेने बोम्मई यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.




























































