
सामना ऑनलाईन । बंगळुरू
कर्नाटकमध्ये अजूनही राजकीय नाट्य सुरूच आहे. दोन अपक्षांनी कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर हे राजकीय नाट्य सुरू झाले होते. आता मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची धमकी काँग्रेसला दिली आहे. काँग्रेसमधील सिद्धरामय्या समर्थकांकडून करण्यात येत असलेल्या टीकाटिप्पणीमुळे कुमारस्वामी नाराज आहेत. काँग्रेस नेते त्यांची मर्यादा सोडत आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अशा नेत्यांना लगाम घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस आमदारांकडून असेच प्रकार सुरू राहिले तर आपण पद सोडू असा इशारा कुमारस्वामी यांनी दिला आहे. सिद्धरामय्या आमचे मुख्यमंत्री आहेत, असे विधान त्यांच्या समर्थकांनी रविवारी एका कार्यक्रमात केले होते. त्यामुळे कुमारस्वामी नाराज असल्याचे बोलले जाते.
काँग्रसमधील सिद्धरामय्या समर्थकांकडून आपल्यावर सातत्याने टीकाटिप्पणी करण्यात येत आहे. काँग्रेस नेतृत्वाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे कुमारस्वामी म्हणाले. याबाबत आपण चिंता करत नसून काँग्रेस नेत्यांचे असेल वागणे कायम राहिले तर आपण पद सोडणार असल्याचे कुमारस्वामी यांनी जाहीर केले. काँग्रेसमधील काही नेते मर्यादा सोडत आहे. पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहनही कुमारस्वामी यांनी केले.
कुमारस्वामी यांच्या या धमकीनंतर सिद्धरामय्या यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस पक्ष जेडीएससोबत आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. कुमारस्वामी यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सिद्धरामया यांनी स्पष्ट केले. त्यांनी या सर्व घटनांचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडले आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांनी काँग्रेस आमदारांचे समर्थन केले आहे. सिद्धरामय्या राज्यातील सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री ठरले आहेत. ते काँग्रेसचे गटनेते असल्याने तेच आमचे मुख्यमंत्री आहेत. काँग्रेस आमदारांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्यामुळे कोणीही नाराज होण्याची गरज नाही. कुमारस्वामी राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे परमेश्वरा यांनी स्पष्ट केले.


























































