
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जारोत सुरू असून आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जेवरगी येथे भर पावसात जोरदार सभा झाली. येथील सरकार टक्केवारीचे सरकार आहे. कोणतेही काम असले तरी यांना 40 टक्के किमिशन हवेच. त्यामुळे येथील भाजप सरकारला 40 टक्क्यांचे सरकार म्हणा असे आवाहन राहुल गांधी यांनी उपस्थितांना केले.
कर्नाटक विधान सभेत काँग्रेसला किमान 150 जागा मिळायला हव्यात. कारण सत्ताधारी भाजपने गेल्या पाच वर्षात येथे मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्याच पैशाच्या जोरावर ते भविष्यातही सरकारच चोरू शकतात, त्यामुळे मोठय़ा फरकाने काँग्रेसला विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच भाजपमध्ये मुख्यमंत्री पद 2500 कोटी रुपयांनी विकले जाते, त्यामुळे त्यांना त्यांच्या क्षमतेएवढय़ाच म्हणजे 40 जागा द्या, कारण त्यांना 40 हा आकडा खूप आवडतो असेही राहुल गांधी म्हणाले. भाजपच्या 40 टक्क्यांच्या कमिशनबाबत येथील कॉन्ट्रक्टर्स असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळवले होते, मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याची टीकाही त्यांनी केली.
प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट वीज मोफत
कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आल्यानंतर येथील प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट वीज मोफत दिली जाईल, महिलांना दरमहा 2000 हजार रुपये, पदवीधरांना दोन वर्षासाठी तीन हजार रूपये युवानिधी आणि पदवीधारकांना दीड हजार रुपये देण्यात येणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

























































