कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालावा, महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर राज ठाकरे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. महाराष्ट्रातले मंत्री शंभुराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झाला आहे. सीमावादावर राजकीय वातावरण तापलं आहे. कर्नाटक मुख्यंमत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्यं सुरू आहेत. या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी याच संदर्भात ट्विटर आणि फेसबुकवर एक पत्रही पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये राज ठाकरे म्हणतात, ‘मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरू झाले आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तत्काळ थांबवा.’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं.’ असं राज ठाकरे म्हणाले.