कवठे येमाईत चोरांचा सुळसुळाट, ग्रामसुरक्षा दल फक्त कागदावरच आहे का? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कवठे येमाईत चोरांचा सुळसुळाट असून पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. शिरुरच्या पश्चिमेकडील सविंदणे गावात मागील महिन्यात चोरीची मोठी घटना घडली होती. या घटनेतील एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले असते तरी, दोन आरोपी अद्याप फरार आहेत. कवठे येमाई शिवारात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत.

वीज रोहित्र आणि केबल चोरी करण्यावर चोरांचा डोळा आहे. वाढत्या चोरांच्या पार्श्वभूमीवर शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये 40 सदस्यांचे ग्रासमसुरक्षा दल तयार करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण एक महिना झाला तरीही हे ग्रामसुरक्षा दल उभे राहिलेले नाही. त्यामुळे ग्रामसुरक्षा दल कागदावरच का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

कवठे येमाई शिवारात बिबट्यांची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी गस्त घातली तर गावकऱ्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणीही घराबाहेर निघत नाही. याच संधीचा चोरट्यांनी फायदा घेत चोरीचा सपाटा सुरूच ठेवला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास फत्तेश्वर बंधाऱ्याजवळील व गावाला पाणिपुरवठा करणाऱ्या अन्य एक असे दोन रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या महागड्या कॉइल चोरून नेल्याची घटना घडली. रोहित्रांची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्यामुळे गावाला तसेच शेतकऱ्यांच्या शेतीला होणारा पाणिपुरवठा ठप्प झाला आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे शेतातील विहिरींमध्ये पाणीसाठा कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गावाची पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे.

शेतमालाला भाव नाही, रोहीत्र चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये व गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तत्काळ या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. विद्युत रोहित्र चोरीला जाऊ नये म्हणून रोहित्र महावितरण विभागाच्या वतीने वेल्डिंग करण्यात येत आहेत. पण चोरटे वेल्डिंग तोडून रोहित्र चोरून नेत असल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

शिरुरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कवठे येमाईत ग्रामसुरक्षा दल स्थापण करणे नक्कीच गरजेचे आहे. त्यांच्या मदतीला पोलीस सुद्धा असतील. तसेच गावातून रात्री अपरात्री जाणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहणे तपासणी करावी, यामध्ये कोणी संशयित आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आगमी दोन दिवसांत कवठे येमाईत तत्काळ ग्रामसुरक्षादल स्थापन करण्यात येणार असून दलातील जवानांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करण्यात येईल.