
सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, किमती वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांनी आता हद्दच केली. अज्ञात चोरट्यांनी खर्डी गावच्या पाणीयोजनेच्या चांदा गावातील ट्रान्सफॉर्मरच चोरून नेला. त्यामुळे खडीं गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून खर्डीवासीयांना बाटलीबंद पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.
खर्डी ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेचा ट्रान्सफॉर्मर चांदा गावाजवळ आहे. पाणी सोडण्यासाठी ग्रामपंचायतीचा कर्मचारी चांदा गावातील या ट्रान्सफॉर्मरजवळ गेला असता त्याला धक्काच बसला. अख्खा ट्रान्सफॉर्मरच आणि पाणीपुरवठा योजनेची केबल चोरट्यांनी पळवून नेली होती. त्यामुळे खर्डीची पाणी योजना ठप्प पडली आहे. गावकऱ्यांना हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. महिला व शाळकरी मुलांना आसपासच्या विहिरींवर जाऊन पाणी शेंदावे लागत आहे. गावातील दुकानदारांकडे असलेल्या बाटलीबंद पाण्याला मोठी मागणी आहे. २५ लिटर पाण्याचे कॅन चढ्या भावाने विकले जात आहेत. ऐन पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी योग्य तो तपास करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाकीर शेख यांनी केली आहे.
मुंब्रा, दिव्यात आज पाणी नाही
ठाणे – दिवा व मुंब्रा प्रभाग समिती हद्दीतील ८०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाला असून त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे उद्या मंगळवार २५ ते बुधवार २६ ऑगस्ट सकाळी ९ वाजेपर्यंत मुंब्रा व दिवा परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंब्रा आणि दिवा या दोन्ही भागांची मिळून अंदाजे ९ ते १२ लाख लोकसंख्या आहे. या दोन्ही भागांना अंदाजे २० ते २५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे या भागात वेळोवेळी पाणीकपात किंवा शटडाऊन केले जाते. दरम्यान, एमआयडीसीच्या जलवाहिनीचे तातडीचे काम हाती घेण्यात आल्याने २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.



























































