
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘दिमागी नक्षल’ या शब्दप्रयोगावरून विरोधकांनी घेरल्यानंतर सरकार बॅकफूटवर गेले आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी आज एक्स पोस्ट करून याबाबत खुलासा केला. पंतप्रधान मोदींनी दिमागी नक्षल हा शब्द विरोधकांसाठी वापरला नव्हता, असे रिजीजू यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दिमागी नक्षल’ हा शब्द वापरला होता. सशस्त्र नक्षलवाद संपला असला तरी ‘दिमागी नक्षल’वादाचा धोका देशापुढे कायम आहे. या लोकांना ओळखून एकटे पाडायला हवे, असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले.
मोदींनी हा शब्द देशातील तरुण, उच्च शिक्षित, विचारवंत आणि राजकीय विरोधकांना उद्देशून वापरल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसे नसल्यास त्यांनी या शब्दाची व्याख्या सांगावी, असे आव्हान काँग्रेसने दिले होते. तर माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी अत्यंत कडवट प्रतिक्रिया दिली होती. दिमागी नक्षल असल्याचा मला अभिमान आहे, असे ते म्हणाले होते. विरोधकांच्या या हल्ल्यानंतर रिजीजू यांनी ‘दिमागी नक्षल’ कोण हे स्पष्ट करणारी यादीच टाकली.
तीन वाक्यांत सारवासारव
- जे माओवाद्यांना पाठिंबा देतात आणि हिंदुस्थानचे संविधान नाकारतात.
- फुटिरतावाद्यांना अनुकूल भूमिका घेऊन कलम 370ला पाठिंबा देतात.
- ईशान्येकडील राज्यांना हिंदुस्थानपासून तोडण्यासाठी चिकन नेक वेगळे करण्याची भाषा करतात.




























































