कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण-अंजनी दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण-अंजनी स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेचे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडून मडगावकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली आहे. तर गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना चिपळूण स्थानकात थांबविण्यात आले आहे.

दरड कोसळल्याने रेल्वे रुळावर आलेली माती आणि दगड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोकण रेल्वे मार्गावरील अंजनी आणि चिपळूण दरम्यान आज दुपारी अचानक दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईकडून मडगावला जायला निघालेल्या मांडवी एक्सप्रेसला खेड स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. पुढील सूचना मिळेपर्यंत मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकातच थांबविली जाणार असून तो पर्यंत तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.

कोकणात कोसळत असलेल्या धुवाधार पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महामार्ग खड्ड्यात गेल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अवघड परशुराम घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने गेले कित्येक दिवस हा घाट वाहतुकीसाठी बंद आहे त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर घाटाच्या दोन्ही बाजूला अवजड वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागला आहेत. महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला असतानाच आता कोकण रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने कोकणात येणारे आणि कोकणातून मुंबई किंवा अन्य शहरांमध्ये जाणारी प्रवाशी अडकून पडले आहेत.

गेल्या तीन वर्षात कोकण रेल्वे मार्गावर माती येण्याच्या प्रकाराना आळा बसला होता. यंदा बर्याच कालावधीनंतर पहिल्याच टप्प्यातील पावसात माती खाली येण्याचा प्रकार घडला आहे. दरडग्रस्त भागात तारेच्या जाळ्या मारण्यात आल्या होत्या त्यामुळे गेल्या काही वर्षांत रेल्वे ट्रॅकवर दरडी कोसळण्याचे प्रमाण घटले आहे. परंतु आज कोसळलेली दरड ही तारेच्या मजबूत जाळ्या तोडून रेल्वे ट्रॅकवर आलेली आहे. या घटनेमुळे कोकण रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहेत.