कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यात आजही सर्वत्र पावसाची संततधार सुरूच राहिली. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत दिवसभरात एका फुटाने वाढ झाली आहे. सायंकाळी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले. त्यातील विसर्गामुळे पंचगंगेची पाणीपातळी पुन्हा वाढणार आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 64.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून, 19 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सकाळी 7 वाजता पंचगंगेची 28 फूट असलेल्या पाणीपातळीत संध्याकाळी 9 इंचांची वाढ झाली होती.

हवामान विभागाने राज्यात पाच दिवसांत ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश असून, जिल्ह्यात त्याचा परिणाम दिसून येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू होती. कालपासून तर संततधार पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. आज दुपारी दीडपर्यंत हातकणंगले- 4.4, शिरोळ-2.7, पन्हाळा-14.2, शाहूवाडी-49, राधानगरी-35.3, गगनबावडा-64.5, करवीर-9.3, कागल-8.4, गडहिंग्लज-10, भुदरगड-10.8 आजरा-15.6 आणि चंदगड तालुक्यात 26.1 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला असून, आज सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास राधानगरी धरणाचा चार क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला. सध्या धरणाचे एकूण चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. या चार दरवाजांतून प्रत्येकी 1 हजार 428, पॉवर हाउसमधून 1 हजार 400 असा एकूण 7 हजार 112 क्युसेक विसर्ग सुरू होता.